ऑस्ट्रेलिया टीमच्या बसवर दगडफेक : फॅन्सनी मागितली माफी

गुवाहाटीमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात पराभवानंतर भारताच्या चाहत्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटरर्सच्या बसवर दगडफेक केली होती. या घटनेनंतर आता या चाहत्यांनी माफी मागितलीये. 

Updated: Oct 12, 2017, 04:55 PM IST
ऑस्ट्रेलिया टीमच्या बसवर दगडफेक : फॅन्सनी मागितली माफी title=

नवी दिल्ली : गुवाहाटीमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात पराभवानंतर भारताच्या चाहत्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटरर्सच्या बसवर दगडफेक केली होती. या घटनेनंतर आता या चाहत्यांनी माफी मागितलीये. 

ऑस्ट्रेलियाचा संघ गुवाहाटीमधील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये थांबला होता. यावेळी चाहत्यांनी पोस्टरद्वारे सॉरी म्हणत दगडफेकीबद्दल माफी मागितली. 

मंगळवारी रात्री दुसरा टी-२० सामना संपल्यानंतर हॉटेलकडे परतत असताना ऑस्ट्रेलियन संघाच्या बसवर चाहत्यांनी दगडफेक केली होती. त्यानंतर आसाम सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते. पोलिसांनीही याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले होते. 

दगडफेकीच्या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर आरोन फिंचने ट्विट करुन या घटनेची माहिती दिली होती. हॉटेलला जात असताना बसच्या खिडकीवर दगडफेक झाली. हे भयानक होते. या ट्विटसोबत त्याने बसच्या खिडकीची काच तुटलेला फोटोही शेअर केला होता. 

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत ट्विट करताना म्हटले की, या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई केली जाईल. तपास सुरु आहे आणि पोलिसांनी दोन संशयितांना अटक केलीये.

दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियावर हातात सॉरीचे पोस्टर घेतलेले फॅन्स दिसतायत. यात या चाहत्यांनी ऑस्ट्रेलिया संघ आणि बीसीसीआयची माफी मागितलीये.