'सरावाला गोळी मारा, त्यांना आराम हवाय'

भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये ३१ रननं विजय झाला. 

Updated: Dec 10, 2018, 11:30 PM IST
'सरावाला गोळी मारा, त्यांना आराम हवाय' title=

ऍडलेड : भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये ३१ रननं विजय झाला. या विजयानंतर खेळाडूंना आरामाची गरज आहे, सरावाला गोळी मारा असं वक्तव्य भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनी केलं आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमधली सीरिज गमावल्यानंतर भारतानं ऑस्ट्रेलिया दौऱ्याची चांगली सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ७० वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतानं पहिली टेस्ट मॅच जिंकली आहे.

इंग्लंडमधल्या पहिल्या टेस्टमध्ये आमचा ३१ रननी पराभव झाला होता. तर दक्षिण आफ्रिकेत आम्ही ६०-७० रननी मॅच गमावली. त्यामुळे या विजयाचा आनंद वेगळाच आहे. जेव्हा तुम्ही चांगली सुरुवात करता तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो.

पुढची टेस्ट मॅच भारत १४ डिसेंबरला पर्थमध्ये खेळणार आहे. या टेस्ट मॅचमध्ये फास्ट बॉलर महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वस रवी शास्त्रींनी व्यक्त केला. या मॅचआधी सराव न करण्याचे संकेत दिले. त्यांना आराम करायचा आहे, सराव गोळी मारा. तिकडे जा, तुमची उपस्थिती दाखवा आणि पुन्हा हॉटेलमध्ये या. आम्हाला माहिती आहे, पर्थची खेळपट्टी जलद आहे, तिकडे फास्ट बॉलरना फायदा होईल, असं शास्त्री म्हणाले.

फास्ट बॉलर ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि स्पिनर आर. अश्विन या चौघांनी उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे पहिल्या इनिंगमध्ये भारताला १५ रनची आघाडी मिळाली, अशी प्रतिक्रिया रवी शास्त्रींनी दिली. तसंच खेळाडूंनी पहिल्या इनिंगमध्ये चुकीचे शॉट मारले. या चुका खेळाडू सुधारतील, असा विश्वास शास्त्रींनी व्यक्त केला.

पहिल्या इनिंगमध्ये शतक (१२३ रन) आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ७१ रनची खेळी करणाऱ्या चेतेश्वर पुजाराचंही शास्त्रींनी कौतुक केलं. भारताचा विकेट कीपर ऋषभ पंतनं या मॅचमध्ये ११ कॅच पकडले. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात एका टेस्टमध्ये एवढे कॅच पकडण्याच्या रेकॉर्डची ऋषभ पंतनं बरोबरी केली आहे. पण या मॅचमध्ये ऋषभ पंतनं मोक्याच्या क्षणी नॅथन लायनचा कॅच सोडला. यावरही शास्त्रींनी प्रतिक्रिया दिली. ऋषभ पंतला त्याचा नैसर्गिक खेळ खेळू द्या. त्याला आणखी थोडी समजदारी दाखवावी लागेल. पण त्यानं ही चूक पुन्हा करता कामा नये, असा सल्ला शास्त्रींनी ऋषभ पंतला दिला.