महिला एकेरीची अंतिम लढत शनिवारी रंगणार

विम्बल्डन चषक पाच वेळा पटकावलेल्या विनस विल्यम्सनं, उपांत्य लढतीत ब्रिटनच्या जोहाना कोंटा हिचा 6-4, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. 

Cars | Updated: Jul 14, 2017, 12:18 PM IST
महिला एकेरीची अंतिम लढत शनिवारी रंगणार title=

विम्बल्डन  : विम्बल्डनची 2017 सालची महिला एकेरीची अंतिम लढत, अमेरिकेची विनस विल्यम्स आणि स्पेनची गॅर्बीन मुगुरुझा यांच्यात शनिवारी रंगणार आहे. विम्बल्डन चषक पाच वेळा पटकावलेल्या विनस विल्यम्सनं, उपांत्य लढतीत ब्रिटनच्या जोहाना कोंटा हिचा 6-4, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. 

जोहाना कोंटाच्या पराभवामुळे विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात आपल्याच देशाच्या महिला खेळाडूला प्रोत्साहित करण्याचं ब्रिटनवासीयांचं स्वप्न भंगलं गेलं. दुसरीकडे स्पेनच्या गॅर्बीन मुगुरुझा हिचा स्लोवाकीयाच्या मॅग्डालेना रीबारीकोवा हिच्या विरोधातला उपांत्य फेरीचा सामना कमालीचा एकतर्फी झाला. मुगुरुझानं रीबारीकोवाला 6-1, 6-1 अशी अगदी सहज मात दिली.

 कोर्टवर कमालीच्या आश्वासकतेनं वावरणा-या मुगुरुझानं, अवघ्या 64 मिनिटांतच रीबारीकोवाला पराभूत केलं. आता तब्बल 9 वर्षांनंतर विम्बल्डन स्पर्धेचा अंतिम सामना विनस विल्यम्स शनिवारी खेळेल. त्याचवेळी मुगुरुझा हिचा विम्बल्डन स्पर्धेतला हा दुसरा अंतिम सामना असेल. त्यामुळे नऊ वर्षांनंतर विनस यंदा विम्बल्डनचा चषक हाती घेणार का याची तिच्या चाहत्यांना नक्कीच उत्सुकता असेल. तर ताज्या दमाची मुगुरुझा काय अनपेक्षित धक्का देते याकडेही टेनिसप्रेमींचं लक्ष लागलेलं असेल.