विराट सचिनचा विक्रम मोडण्याच्या जवळ

भारत आणि वेस्ट इंडिजमधली दुसरी वनडे उद्या विशाखापट्टणममध्ये होणार आहे.

Updated: Oct 23, 2018, 10:16 PM IST
विराट सचिनचा विक्रम मोडण्याच्या जवळ title=

विशाखापट्टणम : भारत आणि वेस्ट इंडिजमधली दुसरी वनडे उद्या विशाखापट्टणममध्ये होणार आहे. या वनडेमध्ये भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीला सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी आहे. वनडे क्रिकेटमध्ये १० हजार रन पूर्ण करण्यासाठी विराटला आणखी ८१ रनची गरज आहे. विराटनं ८१ रन केल्या तर तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १० हजार रन पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरेल. सचिन तेंडुलकरनं हे रेकॉर्ड २५९ इनिंगमध्ये केलं होतं. तर विराट कोहलीनं आत्तापर्यंत २०४ इनिंग खेळल्या आहेत.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये विराट आणि रोहितनं शतकं केली होती. त्यामुळे वेस्ट इंडिजनं ठेवलेल्या ३२३ रनचा पाठलाग भारतानं अगदी सहज केला. या मॅचमध्ये ८ विकेटनं भारताचा विजय झाला. याचबरोबर ५ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये भारतानं १-०नं आघाडी मिळवली आहे.

विराट कोहलीचं वनडे क्रिकेटमधलं हे ३६वं शतक होतं. वनडेत सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकर याच्या नावावर वनडेमध्ये सर्वाधिक ४९ शतकांची नोंद आहे. १०७ बॉलमध्ये १४० रनची खेळी करून विराट कोहली आऊट झाला. विराटच्या खेळीमध्ये २१ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता.

रनचा पाठलाग करताना विराटचं हे २२वं शतक होतं. तर घरच्या मैदानातलं १५वं, कर्णधार म्हणून १४वं आणि वेस्ट इंडिजविरुद्ध ५वं शतक होतं. वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक शतकं करणारा भारतीय खेळाडूही विराट बनला आहे. याआधी सचिन तेंडुलकरनं वनडेमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक ४ शतकं केली होती.

कर्णधार असताना सर्वाधिक शतकं करणारे खेळाडू

रिकी पाँटिंग- २२

विराट कोहली- १४

एबी डिव्हिलियर्स- १३

सौरव गांगुली- ११

सनथ जयसूर्या- १०