AUSvsIND: रोहितचं शतक झालं नाही म्हणून फॅन्स भडकले, विराटला 'सेंच्युरी चोर' म्हणाले

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. 

Updated: Dec 27, 2018, 08:13 PM IST
AUSvsIND: रोहितचं शतक झालं नाही म्हणून फॅन्स भडकले, विराटला 'सेंच्युरी चोर' म्हणाले title=

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. दुसऱ्या दिवशी भारताचा स्कोअर ४४३ रन झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं डाव घोषित केला. कोहलीनं हा निर्णय घेतला तेव्हा रोहित शर्मा ६३ रनवर नाबाद खेळत होता. रवींद्र जडेजाच्या रुपात भारताची सातवी विकेट गेल्यानंतर विराटनं रोहितला परत बोलावलं. पण यानंतर आता रोहितच्या फॅन्सनी विराटवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. रोहित शर्माला शतक करता आलं असतं, पण विराटनं डाव घोषित का केला? विराट कोहली सेंच्युरी चोर आहे, अशी टीका नेटिझन्सनी ट्विटरवर केली आहे. विराट कोहली आणखी काही काळ थांबला असता तर भारताच्या खात्यात आणखी २५-३० रन जमा झाल्या असत्या, आणि रोहितला शतकही पूर्ण करता आलं असतं, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर यांनाही विराट कोहलीचा हा निर्णय विचित्र वाटला. रोहित शर्मा मैदानात असताना भारताला आणखी ५०-७५ रन काढता आल्या असत्या. दुसऱ्यांदा बॅटिंग करताना रन करणं कठीण होईल, त्यामुळे आत्ताच जास्त रन करणं योग्य होतं, असं ट्विट संजय मांजरेकर यांनी केलं. 

दुसऱ्या दिवसाची सुरुवात २१५/२ अशी करणाऱ्या भारतानं चांगली बॅटिंग केली. चेतेश्वर पुजारानं या सीरिजमधलं त्याचं दुसरं शतक केलं. पुजाराला भारताच्या इतर बॅट्समननीही चांगली साथ दिली. मयंक अग्रवालनं ७६ रन, कर्णधार विराट कोहलीनं ८२ रन, रोहित शर्मानं नाबाद ६३ रन, अजिंक्य रहाणेनं ३४ रन आणि ऋषभ पंतनं ३९ रनची खेळी केली. यामुळे भारताला ४४३ रनचा टप्पा गाठता आला.

चेतेश्वर पुजाराचं हे टेस्ट क्रिकेटमधलं १७वं शतक होतं. या शतकाबरोबरच पुजारानं सौरव गांगुलीला मागे टाकलं आहे. गांगुलीच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये १६ शतकांची नोंद आहे. आता शतकांच्या बाबतीत पुजारानं लक्ष्मणच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. चेतेश्वर पुजारानं या मॅचमध्ये शतक केलं असलं तरी त्याचं टेस्ट क्रिकेटमधलं हे सगळ्यात संथ शतक होतं. चेतेश्वर पुजाराला त्याचं शतक पूर्ण करायला २८० बॉल लागले. याआधी २०१२ साली मुंबईमध्ये इंग्लंडविरुद्ध पुजारानं २४८ बॉलमध्ये शतक केलं होतं.