म्हणून धोनीला टी-२० टीममधून वगळलं, विराटचं स्पष्टीकरण

वनडे सीरिजमध्ये भारतानं वेस्ट इंडिजचा ३-१नं पराभव केला आहे. 

Updated: Nov 1, 2018, 10:38 PM IST
म्हणून धोनीला टी-२० टीममधून वगळलं, विराटचं स्पष्टीकरण  title=

तिरुवनंतपुरम : वनडे सीरिजमध्ये भारतानं वेस्ट इंडिजचा ३-१नं पराभव केला आहे. यानंतर आता या दोन्ही टीममध्ये ३ मॅचची टी-२० सीरिज खेळवण्यात येईल. पण या सीरिजमध्ये धोनी भारतीय टीमचा हिस्सा नसेल. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी धोनीची टीममध्ये निवड झालेली नाही. या सगळ्या प्रकरणावर आता भारताचा कर्णधार विराट कोहलीनं भाष्य केलं आहे. धोनी भारताच्या वनडे टीमचा भाग असेल पण ऋषभ पंतला जागा बनवून देण्यासाठी पुढच्या टी-२० सीरिज न खेळण्याचा निर्णय धोनीनं घेतल्याचं विराट म्हणाला.

निवड समितीनं याबद्दल आधीच माहिती दिली आहे. धोनीशी बोलणं झालं आहे. जे काही झालं त्याबद्दल निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं आहे, अशी प्रतिक्रिया विराटनं दिली आहे.

'मी चर्चेचा हिस्सा नव्हतो'

धोनीबद्दल झालेल्या निर्णयाच्या चर्चेत मी सहभागी नव्हतो. निवड समितीनं जे सांगितलं तसंच झालं आहे. लोकं याबद्दल जरा जास्तच विचार करत आहेत, असं मला वाटतंय. पण असं काहीच झालेलं नाही. धोनी अजूनही वनडे टीमचा भाग आहे आणि टी-२०मध्ये ऋषभ सारख्या खेळाडूंना आणखी संधी दिली पाहिजे, असं वक्तव्य विराटनं केलं.

धोनी आता भारताकडून परत कधीच टी-२० मॅच खेळणार नाही असं बोललं जातंय. २०२० साली होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपपर्यंत धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नाही. मग वर्ल्ड कपसाठी टीम तयार करायची असेल तर टी-२० टीममध्ये धोनीला स्थान का द्यावं, असा प्रश्न निवड समितीपुढे होता. तसंच हा निर्णय घेताना कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्माही निवड समितीसोबत होते. त्यामुळे त्यांच्या परवानगीशिवाय धोनीबद्दलचा निर्णय झाला असेल का? असा सवाल बीसीसीआयमधल्या सूत्रानं उपस्थित केला होता.