फक्त ३७ रन्स, १ फोर मारून विराट तोडेल ही ४ रेकॉर्ड

भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या तिसऱ्या टी-20ला थोड्याच वेळात हैदराबादमध्ये सुरुवात होईल. 

Updated: Oct 13, 2017, 05:02 PM IST
फक्त ३७ रन्स, १ फोर मारून विराट तोडेल ही ४ रेकॉर्ड  title=

हैदराबाद : भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या तिसऱ्या टी-20ला थोड्याच वेळात हैदराबादमध्ये सुरुवात होईल. ३ टी-20च्या सीरिजमधली पहिली मॅच भारतानं जिंकली आहे, तर दुसऱ्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाला. त्यामुळे दोन्ही टीम सीरिज जिंकण्यासाठीच मैदानात उतरतील.

हैदराबादमध्ये होणाऱ्या या टी-20मध्ये भारताचा कॅप्टन विराट कोहली चार खास रेकॉर्ड बनवण्याच्या जवळ पोहोचला आहे. या मॅचमध्ये एक फोर मारल्यावर विराट कोहली २०० फोर मारणारा तिसरा खेळाडू बनू शकतो. टी-20 क्रिकेटमध्ये विराटनं आत्तापर्यंत १९९ फोर मारले आहेत. याआधी श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशान आणि पाकिस्तानच्या मोहम्मद शहजादनं हे रेकॉर्ड बनवलं आहे.

तिलकरत्ने दिलशानच्या रेकॉर्डपासून विराट ३७ रन्स दूर

विराट कोहली श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानचं रेकॉर्ड तोडण्यापासून ३७ रन्स दूर आहे. दिलशाननं २००६ ते २०१६मध्ये ८० टी-20 मॅच खेळल्या. या मॅचमध्ये दिलशाननं १,८८९ रन्स बनवल्या, ज्यात एक शतक आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे.

विराटनं ५२ टी-20 मॅचमध्ये १८५२ रन्स बनवल्या आहेत. कोहलीनं आजच्या मॅचमध्ये ३७ रन्स बनवल्या तर टी-20मध्ये सर्वाधिक रन्स बनवणाऱ्यांच्या यादीमध्ये विराट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. या यादीमध्ये न्यूझीलंडचा ब्रॅण्डन मॅक्कलम पहिल्या क्रमांकावर आहे. मॅक्कलमनं आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये २,१४० रन्स बनवले आहेत.

जो रूटलाही विराट मागे टाकणार?

२०१७ मध्ये सर्वाधिक रन्स बनवणाऱ्यांमध्ये विराट कोहली इंग्लंडच्या जो रूटचं रेकॉर्ड तोडू शकतो. रूटनं यंदाच्या वर्षी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ३० मॅच खेळल्या आहेत. यामध्ये त्यानं १,८५५ रन्स बनवल्या. २०१७मध्ये जो रूटनं चार शतकं आणि १२ अर्धशतकं लगावली. तर विराटनं यंदाच्या वर्षी ३७ मॅच खेळल्या, यामध्ये विराटनं १,८४१ रन्स बनवल्या. विराटनं यावर्षात विराटनं ६ शतकं आणि ८ अर्धशतकं लगावली. यंदाच्या मोसमात सर्वाधिक रन्स बनवण्यापासून विराट फक्त १५ रन्स दूर आहे.

टी-20 मध्ये ७ हजार रन्स बनवण्यापासून ३६ रन्स दूर

आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मिळून ७ हजार रन्स पूर्ण करण्यापासून विराट फक्त ३६ रन्स दूर आहे. विराटनं टी-20मध्ये ६,९६४ रन्स बनवल्या आहेत. विराटनं आजच्या मॅचमध्ये ३६ रन्स केल्या तर टी-20 क्रिकेटमध्ये ७ हजार रन्स करणारा विराट पहिला भारतीय आणि जगातला आठवा खेळाडू बनेल.