रोहितच्या पहिल्या दोन द्विशतकावेळी विराटचं विचित्र रेकॉर्ड, यंदा मात्र हुकलं

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मानं द्विशतक झळकावलं. 

Updated: Dec 13, 2017, 05:00 PM IST
रोहितच्या पहिल्या दोन द्विशतकावेळी विराटचं विचित्र रेकॉर्ड, यंदा मात्र हुकलं  title=

मोहाली : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मानं द्विशतक झळकावलं. वनडे क्रिकेटमधलं रोहित शर्माचं हे तिसरं द्विशतक होतं. याआधी रोहितनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१३ साली बंगळुरूमध्ये आणि श्रीलंकेविरुद्ध २०१४साली कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानामध्ये द्विशतक झळकावलं होतं.

रोहितनं द्विशतक झळकावलेल्या या दोन्ही मॅचमध्ये विराट कोहलीच्या नावावर मात्र विचित्र रेकॉर्ड झालं होतं. बंगळुरू आणि कोलकत्याच्या या मॅचमध्ये रोहित शर्मानं विराट कोहलीला रन आऊट केलं होतं. बंगळुरुमध्ये झालेल्या मॅचमध्ये विराट कोहली शून्य रनवर आऊट झाला होता. तर श्रीलंकेविरुद्धच्या वनडेमध्ये विराट ६६ रन्सवर रन आऊट झाला. यावेळी मात्र विराटचं हे विचित्र रेकॉर्ड हुकलं. अनुष्का शर्मासोबतच्या लग्नासाठी विराट कोहली श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी-२०मध्ये खेळणार नाही.

मोहालीमध्ये झालेल्या या मॅचमध्ये रोहित शर्मानं १५३ बॉल्समध्ये २०८ रन्स केल्या. रोहितच्या या इनिंगमध्ये १३ फोर आणि १२ सिक्सचा समावेश होता. २०१३ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्मानं वनडे क्रिकेटमधलं त्याचं पहिलं द्विशतक झळकावलं होतं. या मॅचमध्ये १५८ बॉल्समध्ये २०९ रन्स केल्या होत्या. या खेळीमध्ये रोहितनं १६ सिक्स आणि १२ फोर लगावल्या होत्या.

त्यानंतर एकाच वर्षात म्हणजेच २०१४साली श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये रोहितनं १७३ बॉल्समध्ये २६४ रन्स केल्या होत्या. रोहितच्या खेळीमध्ये ३३ फोर आणि ९ सिक्सचा समावेश होता.