जेव्हा गेल ब्राव्होला म्हणाला, भावा माझ्या बुटाची लेस बांध!

क्रिस गेल आणि ड्वॅन ब्राव्हो टी-20 लीगमध्ये जरी वेगवेगळ्या टीमकडून खेळत असली तरी या दोन्ही वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या मैत्रीबाबत नेहमीच चर्चा होत असते.

Updated: Apr 16, 2018, 04:17 PM IST
जेव्हा गेल ब्राव्होला म्हणाला, भावा माझ्या बुटाची लेस बांध!

मोहाली : क्रिस गेल आणि ड्वॅन ब्राव्हो टी-20 लीगमध्ये जरी वेगवेगळ्या टीमकडून खेळत असली तरी या दोन्ही वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या मैत्रीबाबत नेहमीच चर्चा होत असते. रविवारी पंजाब आणि चेन्नईमध्ये झालेल्या मॅचमध्येही या दोघांची मैत्री पाहायला मिळाली. मॅच सुरु असताना गेलनं ब्राव्होला त्याच्या बुटांच्या लेस बांधायला सांगितल्या. यानंतर ब्राव्होनंही कोणतेही आढेवेढ न घेता गेलच्या बुटांच्या लेस बांधल्या.

क्रिस गेलचं वादळी कमबॅक

टी-20 स्पर्धेसाठी क्रिस गेल किती महत्त्वाचा आहे हे रविवारी चेन्नईविरुद्धच्या सामन्याने पुन्हा एकदा दाखवून दिले. चेन्नईसारख्या मजबूत संघाविरुद्ध त्याने खेळलेल्या खेळीने दाखवून दिले की पंजाबचा त्याला खरेदी करण्याचा निर्णय किती योग्य होता. या स्पर्धेतील पहिल्या दोन बोलीनंतरही क्रिस गेलला कोणी विकत घेण्यास तयार नव्हते. मात्र तिसऱी बोली सुरु असताना प्रीती झिंटाने दोन कोटींच्या बेस प्राईसवर त्याला खरेदी केले.

रविवारी चेन्नईविरुद्धच्या सामन्यात खेळण्यास उतरलेल्या गेलने ३३ चेंडूत ६३ धावा ठोकल्या. त्याने लोकेश राहुलसह मिळून चेन्नईचे आक्रमण परतून लावले. राहुलने ३७ धावांची खेळी केली. मात्र गेलच्या खेळीने साऱ्यांची मने जिंकली. हे त्याचे या स्पर्धेतील दुसरे वेगवान अर्धशतक आहे. याआधी त्याने १७ चेंडूत अर्धशतक ठोकले होते.

पंजाबने चेन्नईसमोर विजयासाठी १९८ धावांचे आव्हान ठेवले होते. ११व्या हंगामात आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या गेलने आक्रमक खेळ करताना सात चौकार आणि चार षटकारांच्या सहाय्याने ६३ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या धोनीच्या संघाला १९३ धावाच केल्या. चेन्नईला स्पर्धेतील पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले.

धोनीचा रोमांचक खेळ

कॅप्टन महेंद्र सिंह धोनीने शानदार खेळ दाखवूनही हा सामना चेन्नईने फक्त ४ रननी गमावला आहे. पंजाबने चेन्नईला आपल्या घरात पहिल्यांदाच हरवलं आहे. चेन्नईने आतापर्यंत दोन सामन्यात विजय मिळवला आहे. मात्र तिसऱ्या सामन्यात फक्त ४ रनकरता खेळ गमवावा लागला. चेन्नईकडून धोनी अगदी शेवटपर्यंत टिकून राहिला पण विजय मिळवून देऊ शकले नाहीत. २० ओव्हरमध्ये ५ विकेट गमावून १९३ रन केल्या.

पाठीच दुखणं असूनही खेळला धोनी

धोनीला पाठीचा प्रचंड त्रास होत आहे. फलंदाजी करताना याचा त्याला भरपूर त्रास झाला. मात्र मैदानावर अगदी खंबीरपणे तो उभा होता. धोनीने ४४ बॉलमध्ये आपल्या खेळात सहा सिक्स आणि ५ फोर मारले. शेवटच्या ५ ओव्हरमध्ये चेन्नईला विजयासाठी ७६ रनची गरज होती आणि ते असंभव वाटत होते. १८ आणि १९ व्या ओव्हरमध्ये १९-१९ रन्स करून शेवटच्या ६ चेंडूत १७ रनची गरज होती. पण चेन्नईला १२ रन्स करता आल्या.