पाठदुखीमुळे हैराण असलेल्या धोनीजवळ युवराज आला आणि...

 पंजाब आणि चेन्नईमध्ये झालेल्या मॅचमध्ये धोनीनं वादळी खेळी केली. पाठीला दुखापत झालेली असतानाही धोनीनं ४४ बॉलमध्ये ७९ रन केल्या.

Updated: Apr 16, 2018, 06:11 PM IST
पाठदुखीमुळे हैराण असलेल्या धोनीजवळ युवराज आला आणि...

मोहाली : पंजाब आणि चेन्नईमध्ये झालेल्या मॅचमध्ये धोनीनं वादळी खेळी केली. पाठीला दुखापत झालेली असतानाही धोनीनं ४४ बॉलमध्ये ७९ रन केल्या. यातल्या ४७ रन तर धोनीनं शेवटच्या ४ ओव्हरमध्ये फटकावल्या. १९८ रनचा पाठलाग करत असताना धोनीला चेन्नईला १९३ रनपर्यंतच पोहोचवता आलं, त्यामुळे चेन्नईचा ४ रननी पराभव झाला. चेन्नईचा या मॅचमध्ये पराभव झाला असला तरी धोनीनं मात्र सगळ्यांचं मन जिंकलं.

धोनीजवळ आला युवराज

मॅच सुरु असतानाच धोनीच्या पाठीला दुखापत झाली. त्यामुळे चेन्नई टीमचा सदस्य मैदानात येऊन धोनीच्या पाठीचं मॉलीश करत होता. धोनीवर उपचार सुरु असताना तो मैदानातच झोपला होता. तेव्हा युवराज धोनीजवळ आला आणि त्यानं धोनीच्या डोक्यावरून हात फिरवून त्याचं सांत्वन केलं.

धोनी-युवराजचं नातं

धोनी आणि युवराजच्या मैत्रीबाबत नेहमीच चर्चा होत असते. २०११ सालचा वर्ल्ड कप जिंकवण्यात या दोघांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. फायनलमध्ये धोनीला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं तर युवराजला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा किताब देण्यात आला. २०१५ सालच्या वर्ल्ड कपमध्ये मात्र युवराजला टीमबाहेर ठेवण्यात आलं. धोनीनंच युवराजला टीमबाहेर ठेवल्याचे आरोपही त्यावेळी झाले होते.

युवराजच्या वडिलांचे धोनीवर आरोप

धोनीमुळेच युवराजला टीमबाहेर राहावं लागलं असल्याचा आरोप युवराजचे वडील योगराज यांनी केले होते. धोनीमुळेच युवराजची कारकिर्द खराब झाल्याचंही योगराज म्हणाले होते. योगराज यांच्या या आरोपांमुळे धोनी-युवराजमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं बोललं जात होतं. पण धोनी-युवराजमध्ये सगळं काही ठिक असल्याचं या मॅचदरम्यान दिसून आलं. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close