युवराज पुन्हा भारताकडून खेळू शकणार नाही?

युवराज सिंग पुन्हा भारताकडून क्रिकेट खेळणार का नाही हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

Updated: Sep 7, 2017, 10:30 PM IST
युवराज पुन्हा भारताकडून खेळू शकणार नाही?  title=

मुंबई : युवराज सिंग पुन्हा भारताकडून क्रिकेट खेळणार का नाही हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. कारण निवड समितीनं प्राधान्य दिलेल्या टॉप ७४ खेळाडूंमध्ये युवराजला स्थान देण्यात आलेलं नाही. निवड समितीच्या या निर्णयामुळे युवराजचं भारतीय टीममध्ये कमबॅक करणं मुश्किल झालं आहे.

ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याला १७ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाची टीम भारतीय बोर्ड इलेव्हनविरुद्ध सराव सामना खेळेल. या सराव सामन्यासाठी निवड करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये युवराजला जागा मिळालेली नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत पाच वनडे आणि तीन टी-20 सीरिज खेळेल. या सीरिजमध्ये श्रीलंकेविरुद्ध असलेलीच टीम मैदानात उतरेल हे जवळपास निश्चित आहे.

तर दुसरीकडे निवड समितीनं दुलीप ट्रॉफीसाठी ४५ खेळाडूंची यादीही जाहीर करून टाकली. पण या यादीमध्येही युवराजला संधी देण्यात आली नाही. या ४५ खेळाडूंमध्ये मात्र सुरेश रैनाला संधी देण्यात आली आहे. सराव सामन्यासाठीचे १४ खेळाडू, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीचे १५ खेळाडू आणि दुलीप ट्रॉफीचे ४५ खेळाडू अशा भारतातल्या टॉप ७४ खेळाडूंमध्येही युवराजची वर्णी न लागल्यामुळे त्याच्यापुढच्या चिंता भविष्यात वाढण्याचीच शक्यता आहे.

युवराजचा फिटनेस कमालीचा घसरला आहे. याबाबत कॅप्टन विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्रीनं निवड समितीला वारंवार सांगितलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भारताकडून खेळण्यासाठी फिटनेसचे काही मापदंड असले पाहिजेत पण युवराज त्यामध्ये बसत नसल्याचं विराट आणि रवी शास्त्रीला वाटतंय. निवड समितीलाही २०१९च्या वर्ल्ड कपसाठी टीम तयार करायची आहे. अशी माहिती बीसीसीआयमधल्या सूत्रांनी दिलीये.