फेक संदेश रोखण्यासाठी व्हाट्सअॅपचे नवे फिचर

 'फॉरवर्ड मेसेज इंडिकेटर', असे या फिचरचे नाव आहे.

Updated: Jul 11, 2018, 11:58 AM IST
फेक संदेश रोखण्यासाठी व्हाट्सअॅपचे नवे फिचर

मुंबई: सोशल मीडियावरून फुटणारे अफवांचे पीक आणि त्यामुळे घडणाऱ्या दुर्घटना याची मोठी किंमत गेल्या काही काळात महाराष्ट्राने चुकवली. देशभरातही समाजकंटकांकडून सोशल मीडियाचा वापर शस्त्रासारखा केला जातोय. जगभरातही हे प्रमाण खूप मोठे आहे. पण, आता अशा प्रकारांना मोठ्या प्रामाणावर आळा बसणार आहे. सोशल मीडियातील महत्त्वाचा घटक असलेले मेसेजिंग अॅप व्हाट्सअॅपने एक नवे फिचर सुरू केले आहे. या फिचरमुळे व्हाट्सअॅपवर येणारा मेसेज कुणी तयार केला आहे याचा पत्ता लागणार आहे. याचाच अर्थ तुम्ही फॉरवर्ड करत असलेला मेसेज हा तुमचा स्वत:चा आहे की, तो दुसऱ्याच कोणी तयार केला आहे, हे या फिचरमुळे कळण्यास मदत होणार आहे. 'फॉरवर्ड मेसेज इंडिकेटर', असे या फिचरचे नाव आहे.

मेसेजचा निर्माता कोण ? होणार उलघडा

या फिचर्सची माहिती देण्यासाठी कंपनीने जगभरात अनेक पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. या पत्रकार परिषदेत सांगण्यात येत आहे की, यूजर्सला आलेल्या एकूण मेसेजपैकी किती मेसेज हे संबंधीत व्यक्तीने तयार केलेले नसून, ते कॉपी पेस्ट (फॉरवर्ड) आहेत हे समजू शकणार आहे. तसेच एखाद्या व्यक्तीने तो मेसेज स्वत: तयार केला असेल तरीही त्याची माहिती समोरच्या व्हाट्सअॅप यूजर्सला मिळू शकते.

व्हाट्सअॅपच्या अपडेट वर्जनमध्ये नवे फिचर

दरम्यान, हे नवे फिचर्स तुमच्या व्हाट्सअॅपमध्ये सुरू होण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅपचे अपडेट असलेले व्हर्जन वापरावे लागेल. व्हाट्सअॅपने चांगले पाऊल टाकत हे फिचर तर तयार केले. पण, फेक न्यूज आणि फेक संदेशांना आळा घालण्यासाठी हे फिचर्स किती कामी येईल हे लवकरच समजणार आहे. दरम्यान, राज्यात मुले चोरणाऱ्या टोळीची अफवा पसरल्यावर  गावातील जमावाने पाच लाकांना ठार केले. त्यानंतर राज्यासह देशभरात खळबळ उडाली. अफवांमधूनच अनेकांना जमावाची मारहाण झाल्याची घटना गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेशमध्येही पहायला मिळाल्या आहेत.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close