जिओ आणि एअरटेलनंतर वोडाफोनने आणला जबरदस्त प्लान

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी वोडाफोनने आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त प्लान लॉन्च केला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 11, 2017, 05:59 PM IST
जिओ आणि एअरटेलनंतर वोडाफोनने आणला जबरदस्त प्लान title=

नवी दिल्ली : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी वोडाफोनने आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त प्लान लॉन्च केला आहे.

१७६ रुपयांचा सुपर प्लान

फ्री रोमिंगची सुविधा असलेला हा अनलिमिटेड सुपर प्लान १७६ रुपयांचा आहे. मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये वोडाफोन इंडियाचे व्यवसाय प्रमुख मोहित नरुला यांनी सांगितले की, भारतातील दुसरा सर्वात मोठा मध्यप्रदेश आणि छत्तीसगड सर्कल आहे.

रोमिंग फ्री आणि मोफत कॉलिंग सुविधा

मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या सीमा इतर सात राज्यांशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे या राज्यांतून इतर राज्यांत जाणाऱ्यांची संख्याही तितकीच मोठी आहे. यामुळे वोडाफोनचा नवा सुपर प्लान ग्राहकांसाठी रोमिंग फ्री आणि मोफत कॉलिंग सुविधा उपलब्ध करुन देत आहे. या सुविधेचा ग्राहकांना मोठा फायदा होईल.

२८ दिवसांची वैधता

वोडाफोन केवळ १७६ रुपयांत रोमिंगवर अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल कॉल्सची सुविधा देत आहे. याची वैधता २८ दिवसांसाठी असणार आहे. या काळात दररोज १जीबी २जी इंटरनेट सुविधा ग्राहकांना मिळणार आहे.

प्री-पेड ग्राहकांसाठीच असणार हा प्लान

वोडाफोनचा हा प्लान केवळ मध्यप्रदेश आणि छत्तीसगड सर्कलमधील प्री-पेड ग्राहकांसाठीच असणार आहे. हा प्लान खासकरुन रोमिंग लक्षात ठेवून बनवण्यात आला आहे. 

वोडाफोनने यापूर्वी सुपर प्लान्स अंतर्गत प्री-पेड ग्राहकांसाठी ५ नव्या प्लान्सची घोषणा केली होती. या प्लान्समध्ये ग्राहकांना इंटरनेट डेटा, एसएमएस, अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल्स, नॅशनल रोमिंग कॉल कॉम्बो मिळणार आहे.