'हवाई हद्दीत शिरलेले भारतीय ड्रोन क्रॅश'; चीनचा दावा

ऑगस्ट महिन्यात डोकलाम सीमा वादाने भारत आणि चीन यांच्यात संघर्षाचे टोक गाठले होते

अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 7, 2017, 12:40 PM IST
'हवाई हद्दीत शिरलेले भारतीय ड्रोन क्रॅश'; चीनचा दावा

पेईचिंग : दुसऱ्यांच्या भूप्रदेशावर दावा सांगणे ही चीनची खोड आता कुणाला नवी राहिली नाही. पण, चीनने आता नवाच दावा केला आहे. आपल्या हवाई हद्दीत आलेले भारतीय ड्रोन क्रॅश झाल्याचा दावा चीनने केला आहे.

वृत्तसंस्था सिन्हुआने वेस्टर्न थिएटर कमांडच्या जॉईंट स्टाफ विभागाचे कॉम्बॅट ब्युरोचे उप प्रमुख झँग शुइली यांच्या हवाल्याने गुरूवारी दिलेल्या वृत्तात हा दावा करण्यात आला आहे. या वृत्तात म्हटले आहे की, भारतीय ड्रोन चीनच्या हवाई हद्दीत आले व त्यानंतर त्याला अफघात झाल्याने ते क्रॅश झाले. लष्कराने ड्रोनची तपासणी करून सत्यता पडताळल्याचाही दावा चीनने केला आहे.

झँग यांना वाटते की, 'भारताच्या या पावलामुळे चीनच्या प्रादेशीक हक्काचे उल्लंघन झाले आहे. आम्ही भारताच्या या गोष्टीचा विरोध करतो. आम्ही आमचे मिशन पूर्ण करू व चीनच्या राष्ट्रीय आणि भौगोलिक सीमेचे रक्षण करू', असेही झँग यांनी म्हटले आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात डोकलाम सीमा वादाने भारत आणि चीन यांच्यात संघर्षाचे टोक गाठले होते. त्यानंतर भारताचा पवित्रा पाहून चीनने डोकलाममधून आपले सैन्य मागे घेतले होते.