'या' देशात सणानिमित्त पुरलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्याची अजब प्रथा !

जगापासून दूर असलेल्या इंडोनेशियातल्या सुलावेसी बेटावर सध्या सणावाराला असावी तशी लगबग चालू आहे. कारण काहीसे अजबच आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 13, 2017, 11:06 AM IST
'या' देशात सणानिमित्त पुरलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्याची अजब प्रथा !
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

इंडोनेशिया : जगापासून दूर असलेल्या इंडोनेशियातल्या सुलावेसी बेटावर सध्या सणावाराला असावी तशी लगबग चालू आहे. कारण काहीसे अजबच आहे. येथे मृतदेहांना थडग्यातून बाहेर काढून नटवण्यात येते. यासाठी संपूर्ण गाव व्यस्त आहे. गावातील घराघरात आपल्या नातेवाईकांचे, प्रियजनांचे मृतदेह सजवून सजवून ठेवले जातात. मग त्या मृतदेहाशेजारी बसून जेवण करायचे, फोटो काढायचे असे प्रकार तिथे चालतात. हे सगळ ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तर काहींना भीती देखील. 

मृतदेह पुरुन दफन विधी एकदा झाला की पुन्हा तो मृतदेह बाहेर काढला जात नाही हे आपल्याला माहिती असेलच. पण या बेटावर मात्र वेगळीच प्रथा आहे. थडग्यात पुरलेल्या मृतदेहाला बाहेर काढतात. मृतदेहांना नवीन कपडे, दागिने घालून सजवतात. काही घरांत तर नातेवाईकांचा मृत्यू झाला की त्यांना कित्येक दिवस दफनही केलं जातं नाही. मृतदेहावर रासायनिक प्रकिया करून तो जतन केला जात असल्याची माहिती ‘डेली मेल’नं दिली आहे. ही प्रथा जपणारी लोक सगळी टोराजॅन समाजातील आहेत. 

खरंतर या लोकांचा मरणावर विश्वास नाही. मरणानंतरही त्या व्यक्तीचा जीवन प्रवास सुरू राहतो, अशी या लोकांची धारणा आहे. त्यामुळे दरवर्षी ‘मानेने’ या  सणात ते मृतदेहांना उकरून बाहेर काढतात. शरीराने आपल्यात नसलेल्या नातेवाईक आणि प्रियजनांसोबत वर्षांतून एक दिवस ते या सणाच्या निमित्ताने घालवतात. घराघरांत लज्जतदार पदार्थांची दावत असते. घरात गोड, तिखट असे विविध पदार्थ तयार केले जातात.आणि मृतदेहाला या पदार्थांचा भोग दाखवला जातो.