कुराण ऑनलाईन वाचणाऱ्या व्यक्तीस चीनमध्ये शिक्षा

चीनमधील अशांत शिनजियांग प्रांतात एका व्यक्तीस शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या व्यक्तीचा गुन्हा इतकाच की, त्याने कुरान ऑनलाईन वाचले. वय वर्षे ४९ असलेल्या या व्यक्तीस दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 12, 2017, 10:17 PM IST
कुराण ऑनलाईन वाचणाऱ्या व्यक्तीस चीनमध्ये शिक्षा

बीजिंग : चीनमधील अशांत शिनजियांग प्रांतात एका व्यक्तीस शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या व्यक्तीचा गुन्हा इतकाच की, त्याने कुरान ऑनलाईन वाचले. वय वर्षे ४९ असलेल्या या व्यक्तीस दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

शिनजियांगच्या हायर पीपल्स कोर्टाची शाखा असलेल्या ली कजाखच्या स्वतंत्र न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली. हुआंग शेख असे या शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव असून, कुरान ऑनलाईन वाचल्याबद्धल न्यायालयाने त्याला दोषी ठरवले. चीनमधील सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, हुंआंग शेख याने अधार्मिक जागेवर कुराणातील उपदेश वाचला. त्याचे हे वर्तन प्रशासकीय धार्मिक नियमांचे उल्लंघन करणारे आहे. त्याच्या वागण्याने समाजाचेही नुकसान झाले. त्यामुळे न्यायालयाने त्याला शिक्षा ठोठावली.

अल्पसंख्याक जाती समूहाचा सदस्य असलेल्या हुआंगने जून २०१६मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून एक ग्रुप बनवला होता. या ग्रुपच्या माध्यमातून त्याने सुमार १०० लोकांना धार्मिक वर्तन कसे कारवे हे शिकवले होते.