घरात एकूण ६ लोक, सर्वच्या सर्व दहशतवादी, हादरला देश

 ज्या कुटुंबाने हल्ला केला ते कुटुंब दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटशी संबंधीत असून, हे लोक सीरियावरून परतत होते, असे पोलिसांनी म्हटले आहे.

Updated: May 14, 2018, 12:52 PM IST
घरात एकूण ६ लोक, सर्वच्या सर्व दहशतवादी, हादरला देश title=

नवी दिल्ली: इंडोनेशियातील पूर्व जावा प्रांताची राजधानी सुराबाया रविवारी (१३ मे) चर्चमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांनी हादरून गेली. यात १३ लोकांचे प्राण गेले तर, सुमारे ४१ लोक जखमी झाले. पोलिसंनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. पण, तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतशी धक्कादायक माहिती पुढे येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात एकाच कुटुंबातील ६ सदस्य सहभागी आहेत. यात १२ आणि ९ वर्षांच्या मुलींचाही समावेश आहे. ज्या कुटुंबाने हल्ला केला ते कुटुंब दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटशी संबंधीत असून, हे लोक सीरियावरून परतत होते, असे पोलिसांनी म्हटले आहे.

एकाच कुटुंबाने केला चर्चवर हल्ला

पूर्व जावा पोलीस प्रवक्ते फ्रान्स बारूंग मनगेरा यांनी सुराबाया येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, हल्ल्यातील पती एवेंजा कार चालवत होता. या कारमध्ये स्फोटके होती. त्याने ही कार चर्चच्या मुख्य गेटवर धडकवली. दरम्यान, याच वेळी कुटुंबप्रमुख पतीची पत्नी आणि दोन मुली दुसऱ्या आणि तिसऱ्या चर्चवर हल्ला करत होत्या. प्रवक्ते मनगेरांनी पुढे सांगितले की, कुटुंबातील दोन मुले बाईक चालवत होते. त्यांनीही आपल्या शरीरावर स्फोटके बांधून ठेवली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींचे वय १२ आणि ९ वर्षे आहे. तर, हल्ला करणाऱ्य़ा दोन मुलांचे वय हे १८ आणि १६ होते.

काहीच मिनीटांच तीन ठिकाणी हल्ले

बारूंग मनगेरा माहिती देताना म्हणाले, पहिला हल्ला सुराबया येथील सांता मारिया रोमन कॅथेलीक चर्चमध्ये झाला. त्यानंतर काहीच मिनीटांनी दीपोनेगोरो येथे ख्रिश्चन चर्चवर दुसरा हल्ला झाला. तर, शहरातील पंटेकोस्टा चर्चमध्ये तिसरा हल्ला झाला. या भयावह हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट्सने घेतली आहे.