तुमच्या आजुबाजुच्या गाड्या अचानक हवेत उडू लागल्या तर...

वेग, विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानवाची प्रगल्भ होत चाललेली महत्त्वाकांक्षा या सगळ्याचा आविष्कार म्हणजे चीनमधल्या 'हवेत उडणाऱ्या टॅक्सी'...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 8, 2018, 11:36 PM IST
तुमच्या आजुबाजुच्या गाड्या अचानक हवेत उडू लागल्या तर...

मुंबई : वेग, विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानवाची प्रगल्भ होत चाललेली महत्त्वाकांक्षा या सगळ्याचा आविष्कार म्हणजे चीनमधल्या 'हवेत उडणाऱ्या टॅक्सी'...

चीनमध्ये एअर टॅक्सी अर्थात हवेत उडणाऱ्या टॅक्सींची चाचणी यशस्वी झालीय. चीनमध्ये ट्रॅफिक ही प्रचंड मोठी समस्या... यामधून मार्ग काढण्यासाठी आता या एअर टॅक्सींचा शोध लागलाय.

भविष्यातल्या गाड्या अशा असतील?

'ई-हांग १८४' असं या टॅक्सींचं नाव आहे. सध्या या एअर टॅक्सीमधून एकच व्यक्ती प्रवास करू शकते. पूर्णपणे इलेक्ट्रिक असलेली ही टॅक्सी 15 किलोमीटरचा प्रवास एका टप्प्यात करु शकते.... या टॅक्सीचा वेग ६० किलोमीटर इतका असणार आहे. या टॅक्सीत बसल्यावर फक्त ज्या ठिकाणी जायचं, ते ठिकाण निवडायचं... मग ती टॅक्सी आपोआप तुम्हाला त्या ठिकाणी नेऊन पोहोचवते... चीनपाठोपाठ ही टॅक्सी अमेरिका आणि यूएईमध्ये लॉन्च केली जाणार आहे. भविष्यात कशा पद्धतीच्या कार्स रस्त्यावर चालतील किंवा हवेत उडतील, याची ही चुणूक आहे...

ऑर्बिट शिफ्टिंग

जमिनीवर चालणाऱ्या, पाण्यात पोहणाऱ्या आणि हवेत उडणाऱ्या कार्स आतापर्यंत फक्त बॉन्डपटात, सायफाय सिनेमांमध्ये किंवा रजनीकांतच्या सिनेमात दिसायच्या... पण आता त्या प्रत्यक्षात दिसणार आहेत... तुमच्या आजूबाजूनं धावणाऱ्या कार्समध्ये ड्रायव्हरच नसेल, असं अगदी पुढच्या काही वर्षांतच दिसणार आहे. ड्रायव्हरलेस, इलेक्ट्रिक, सोलर आणि हायब्रिड कार्सचा जमाना येतोय... २०३० पर्यंत भारतातल्या ४० टक्के कार्स इलेक्ट्रिक करण्याचं भारत सरकारचं उद्दिष्ट आहे... सौरऊर्जा आणि वीजेवर चालणाऱ्या कार्स काही देशात रस्त्यांवर आधीच उतरल्यात. सध्या कार मार्केटमध्ये ज्या कंपन्यांचा दबदबा आहे, त्या कंपन्यांचंही सध्या हायब्रिड, सोलर आणि इलेक्ट्रिक कार्स तयार करण्याच्या दृष्टीनं ऑर्बिट शिफ्टिंग सुरू आहे.

पर्यावरणपूरक कार

सध्या जगभरातल्या एकूण वाहनांपैकी फक्त एक टक्का वाहनं इलेक्ट्रिक आहेत. २०३० पर्यंत ही संख्या तिप्पट होण्याचा अंदाज आहे. निती आयोगाच्या योजनेनुसार २०३० पर्यंत भारतातली ४० टक्के वाहनं इलेक्ट्रिक करण्याचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी देशभरात इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची प्रक्रियाही सुरू झालीय. इलेक्ट्रिक वाहनं साधारण वाहनांच्या तुलनेत ३० ते ४० टक्के कमी कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतात. भविष्यातलं प्रदूषण, इंधनाचे दुर्मिळ होत जाणारे साठे आणि इंधनाच्या वाढत्या किंमती हे सगळं लक्षात घेता पर्यावरणपूरक कार तयार करण्याकडे सगळ्याच कंपन्यांचा कल असणार आहे.... हा त्याचाच ट्रेलर आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close