|
हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची एखाद्या योध्याप्रमाणे मृत्यूशी सुरू असणारी झुंज शनिवार,१७ नोव्हेंबर २०१२ रोजी दुपारी ३.३३ वाजता थांबली.
त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. जलील परकार यांनी ही घोषणा केली. त्यांच्या जाण्याने तमाम शिवसैनिकांसह लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला.
शिवसेनाप्रमुखांच्या प्रकृतीमध्ये चढऊतार सुरू होता. लीलावती रुग्णालयाचे डॉ. जलील परकार त्यांच्यावर उपचार करीत होते. ‘मातोश्री’वरच संपूर्ण उपचाराची सोय करण्यात आली होती. गेल्या १० नोव्हेंबर रोजी बाळासाहेबांची प्रकृती कमालीची खावल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून चिंतेचे वातावरण पसरले होते.
मात्र ११ नोव्हेंबर रोजी पुन्हा त्यांच्या प्रकृती सुधारत होत असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले होते. बुधवारी पुन्हा अचानक शिवसेनाप्रमुखांची प्रकृती खालावली. त्यांची प्रकृती खालवल्याचे वृत्त पसरताच हजारो शिवसैनिक आणि बाळासाहेबांच्या चाहत्यांनी ‘मातोश्री’कडे धाव घेतली. यावेळी विविध मान्यवरांनी ठाकरे कुटुंबीयांची भेट घेतल्यामुळे बाळासाहेबांच्या चिंतेचे वातावरण पसरले होते.
वेगवेगळ्या अफवांना ऊत आला होता. मात्र रात्री उशिरा शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितल्याने काहीसा तणाव कमी झाला होता. शुक्रवारी त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती आली. चमत्कार घडेल आणि बाळासाहेब पुन्हा बरे होईल, अशी आशा त्यांच्या चाहत्यांना निर्माण झाली होती. १७ नोव्हेंबर रोजी सकाळी शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी बाळासाहेबांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले होते. मात्र दुपार नंतर अचानक ‘मातोश्री’वर मान्यवर नेत्यांची वर्दळ पुन्हा वाढली आणि बाळासाहेबांच्या प्रकृती बाबत चिंता व्यक्त केली जाऊ लागली.
अखेर शनिवारी दुपारी शिवसेना नेत्यांच्या सोबत लीलावती रुग्णालयाचे डॉ. जलील परकार प्रसार माध्यमांना सामोरे गेले आणि शिवसेनाप्रमुखांच्या निधनाची घोषणा केली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून उपचार करीत होतो. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी आम्ही शर्तीचे प्रयत्न केले. मात्र आज दुपारी ३.३३ मिनिटांनी शिवसेनाप्रमुखांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले, असे परकार यांनी जाहीर करताच ‘मातोश्री’बाहेर जमलेल्या शिवसैनिकांचा बांध फुटला.
रविवार १८ नोव्हेंबर २०१२ रोजी मातोश्री ते शिवाजी पार्क अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत सुमारे २५ लाख चाहते आणि शिवसैनिक सामील झाले. त्यानंतर शिवाजी पार्क येथे लाखोंच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
|