|
महाराष्ट्राचे सत्ताकेंद्र असलेल्या मुंबईतील मंत्रालय इमारतीच्या चौथ्या मजल्यावर २१ जून २०१२ रोजी लागलेल्या आगीमुळे संपूर्ण मंत्रालय चौथा, पाचवा आणि सहावा मजला जळून खाक झाला. प्रमुख मंत्र्यांसह सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मंत्रालयात उपस्थित असताना आग लागून मोठे नुकसान झाले.
आदिवासी विभाग, नगरविकास विभाग आणि महसूल विभागाची महत्त्वपूर्ण कागदपत्रे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
मंत्रालयाचे काम नेहमीप्रमाणे सुरू असताना २१ जून २०१२ रोजी दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी चौथ्या मजल्यावर शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली. आगीमुळे प्रचंड धूर झाला. त्या धुराच्या लाटा सर्व मजल्यांवर पसरल्या. अनेक विभागांचे मंत्री आणि अधिकारी कर्तव्यावर असल्याने अडकले.
लिफ्ट बंद झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिवासी मंत्री बबनराव पाचपुते, तसेच पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे पायऱ्या उतरून मंत्रालयाच्या बाहेर पडले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण एका बैठकीच्या निमित्ताने सह्याद्री अतिथिगृहावर होते.
दरम्यान, चौथ्या मजल्यावरील आग पाचव्या मजल्यावर देखील पोचली. पाचव्या आणि सहाव्या मजल्यावरील अनेक कर्मचारी उशिरापर्यंत अडकले होते. दक्षिण मुंबई आणि परिसरातील अग्निशामक केंद्रांचे सर्व बंब मंत्रालयावर पाठविण्यात आले. अग्निशामक दलाचे कर्मचाऱ्यांनी आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या आगीत तीन जणांचा जळून मृत्यू झाला.
जवळपास 16 अग्निशामक बंबांनी आग आटोक्यायत आणण्याचा प्रयत्न केला. उशिरापर्यंत मंत्रालयातील बहुतेक कर्मचाऱ्यांना मंत्रालयातून बाहेर काढण्यात आले होते. मंत्रालयाला आग लागल्याने या परिसरात बघ्यांची गर्दी वाढली होती.
|