|
कल्याणचे शिवसेना खासदार आनंद परांजपे यांना आपल्या पक्षाकडे खेचून घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेला २० जानेवारी २०१२ रोजी जोरदार धक्का दिला. शरद पवार यांच्या उपस्थितीत खासदार आनंद परांजपे यांनी पक्ष नेतृत्त्वावर टीका करत शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. परांजपे यांनी राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश केला नाही.
बाळासाहेब माझा विठ्ठल तर पवार कृष्ण!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझे विठ्ठल आहेत तर शरद पवार माझे कृष्ण असल्याचे भाष्य परांजपे यांनी केले होते. मात्र मी शिवसेनेत असून राष्ट्रवादीत सामिल झालो नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एकीकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर व्यक्त करत असताना त्यांनी पवारांसमोर शिवसेनेवर टीकाही केली. शिवसेनेमध्ये निष्ठावंतांची गळचेपी होत असून विकासाच्या कामांवर चर्चा केली जात नाही. शिवसेनेच्या सध्याच्या नेतृत्वाला सत्ता जणू सर्वकाही झाले असल्याची टीका परांजपे यांनी केली.
ठाण्यात महापालिका निवडणुकांपूर्वी शिवसेनेने सुरु केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाला चोख प्रत्युत्तर देण्याचा राष्ट्रवादीच्या प्रयत्नाचा भाग होता. ठाणे शहरातील राष्ट्रवादीचे आमदार सुभाष भोईर आणि काही नगरसेवकांना शिवसेनेने फोडले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करत राष्ट्रवादीतील बंडखोरांनी शिवसेनेचा आश्रय घेतला होता.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या या धक्कातंत्राचा शिवसेनेनेवर काहीही परिणाम होणार नसल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली होती.
|