|
शिवसेनेचे आमदार सुरेश जैन यांना ११ मार्च २०१२ रोजी जळगाव महापालिकेच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली. पोलिसांनी धरणगाव इथे पाठलाग करत मध्यरात्री उशिरा सुरेश जैन यांना अटक केली.
अटकेची कुणकुण लागताच सुरैश जैन इंदूरला जाण्याच्या तयारीत होते. त्यामुळे जळगावात पोलिसांनी नाकाबंदी केली होती. त्यांना सध्या जळगाव शहर पोलिस ठाण्यात ठेवण्यात आलं आहे. जैन यांच्या अटकेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी ९० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.
आमदार जैन स्वीय सहायक भावसार यांच्यासह होंडा अॅयकॉर्ड या गाडीने जळगावहून इंदूरकड निघाले होते. रात्री सव्वा बाराच्या सुमारास धरणगाव येथील रेल्वेगेट बंद असल्यामुळे त्यांची गाडी थांबली. त्यावेळी पोलिस निरीक्षक डी. एस. शिनगारे यांनी त्यांना तेथेच अटक केली. धरणगाव येथून आमदार जैन यांना त्यांच्याच वाहनाने जळगाव शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. रात्री एक वाजता शहर पोलिस ठाण्यात पोहोचल्यावर त्यांची प्राथमिक चौकशी करण्यात आली.
सुरेश जैन यांच्या अटकेने सध्या जळगावात तणावाचे वातावरण होते. आमदार जैन यांच्या अटकेनंतर शहरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.
तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी २००६ मध्ये घरकुल योजनेतील घोटाळा उघडकीस आणला होता. दरम्यान, घरकुल प्रकरणात २८ जानेवारी रोजी तत्कालीन नगरसेवक प्रदिप रायसोनी, खान्देश बिल्डर्सचे संचालक राजा मयूर, नाना वाणी आणि माजी मुख्याधिकारी पी.डी.काळे यांना अटक करण्यात आली होती.
त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव देवकर, आमदार सुरेश जैन, माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत चौधरी, चत्रभुज सोनवणे, सिंधू कोल्हे, लता भोईटे यांच्यासह इतरांची चौकशी करण्यात आली.
मंत्री गुलाबराव देवकर यांनी अटक
जळगावमधल्या घरकुल घोटाळ्याप्रकऱणी आरोपी असलेले परिवहन राज्यमंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना २१ मे २०१२ रोजी अटक करण्यात आली. चौकशीला गैरहजर राहिलेल्या गुलाबराव देवकरांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
देवकर हे घरकुल घोटाळ्यातले प्रमुख आरोपी असून तत्कालीन नगराध्यही होते. 29 कोटी 59 लाख रुपयांच्या या घोटाळ्यात अटक झालेले दुसरे मोठे दिग्गज आहेत. यापूर्वी शिवसेना आमदार सुरेश जैन यांना अटक करण्यात आली होती. तर यावेळी चौकशीला हजर असलेल्यांपैकी 25 आजी माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना अटक करण्यात आली होती. यात 15 जणांना जामीन मंजूर करण्यात आला होता, तर 10 जणांचा जामीन फेटाळण्यात आला होता.
|