close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ब्लॉग : नेमकं कुठे बिघडलं पवारांचं गणित?

माघार घेताना कुटुंबात चर्चा करून निर्णय घेतला असल्याचं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. पण वस्तुस्थिती तशी नव्हती

ब्लॉग : नेमकं कुठे बिघडलं पवारांचं गणित?

रामराजे शिंदे, सिनिअर करस्पाँडन्ट,

झी मीडिया, दिल्ली

शरद पवार यांनी 'कॉमर्स'मधून पदवी घेतली आहे. त्यामुळे अकाऊंट कसं टॅली करायचं? ते त्यांना चांगलंच माहीत आहे. परंतु माढ्याचं गणित पवारांना सोडवता आलं नाही. आत्तापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत अवघड गणिताची कोडी सहज उलगडणाऱ्या शरद पवार यांना शेवटच्या टप्प्यातील फायनल अकाऊंट सोडवण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोलापूर जिल्ह्यात दोन दिग्गज नेते, एक सुशिलकुमार शिंदे तर दुसरे विजयसिंह मोहीते-पाटील... परंतु २००९ मध्ये सोलापूरच्या राजकारणात शरद पवार यांनी एन्ट्री केली आणि विक्रमी मतांनी निवडून आले. आत्ता दहा वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. नव्हे तर पवारांनी कार्यकर्त्यांशी जोडलेला विश्वासर्हतेचा पूल वाहून गेला. पवारांच्या नावाला विरोध होतो आहे, हे का घडलं? कसं घडलं? काय परिस्थिती निर्माण झाली आणि यासाठी जबाबदार कोण? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पुन्हा सोलापूरवरून बारामतीला जावं लागतं... कारण, सगळी उत्तरं तिथंच दडली आहेत.


विजयसिंह मोहिते-पाटील

ठिणगी कुठं पडली ?

या लोकसभेतून शरद पवार यांच्या अपेक्षा अधिक उंचावल्या आहेत. म्हणूनच पवारांनी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून देण्यासाठी रणनीती आखली. राहुल गांधी यांचा करिष्मा हवा तसा चालत नाही तर मोदी यांचा करिष्मा उतरल्याचा अंदाज घेऊनच पवारांनी माढा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु पवारांसमोर अडचण होती की, विजयसिंह मोहीते-पाटील यांचा पत्ता कसा कट करायचा. त्यासाठी पवारांनी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना हाताशी धरलं. लोकसभेचं तिकीट देण्याचं आश्वासन देऊन माढा मतदारसंघातून कामाला लावलं. मोहीते-पाटील यांच्यावर अविश्वास दाखवत पवारांनी प्रभाकर देशमुख यांना पुढे केलं. देशमुखांनी सहा महिन्यांपासूनच माढा मतदारसंघात कार्यकर्त्यांची बांधणी सुरू केली. बॅनर लावले. विद्यमान खासदार मोहिते-पाटील यांना डावलून प्रभाकर देशमुख हा पॅराशूट उमेदवार उतरवल्यामुळे माढ्यातील जनतेत संभ्रम निर्माण झाला. पहिली ठिणगी तिथचं पडली.

उमेदवारी नाट्य कसं घडलं ?

शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ७ फेब्रुवारी रोजी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे पाठवले. त्यावेळी मोहिते-पाटील पुण्यात होते. जयंत पाटील यांनी सांगितले की, 'तुमच्या विरोधात नाराजी खूप आहे. यावेळी कोणीतरी सिनियर नेत्याने माढ्यातून लढायला हवं'. त्यावेळी, विजयदादा म्हणाले, 'मी सिनियर नाही का?' त्यानंतर जयंत पाटील म्हणाले, 'तसं नाही. सध्या राष्ट्रीय राजकारणात वेगळी परिस्थिती निर्माण झालीय. त्यामुळे पवार साहेब स्वतः माढ्यातून निवडणूक लढवू इच्छित आहेत'. विजयदादा म्हणाले, 'पवार साहेब उभे राहणार असतील तर मग होकार... पण, यासाठी तुम्हाला का पाठवलं, पवार साहेब स्वतः सांगू शकले असते'. जयंतराव म्हणाले, 'त्यासाठीच तुम्हाला सकाळी बारामती हॉस्टेलमधील बैठकीला बोलवलंय. आपण सोबत जाऊन पवारांनी निवडणूक लढवण्याची मागणी करू'...

दुसऱ्या दिवशी बारामती हॉस्टेल बैठक सुरू झाल्यानंतर् जयंत पाटील यांनी विषय काढला. 'आमच्या सर्वांची इच्छा आहे की, तुम्ही लढावं' जयंतराव पवारांना म्हणाले. त्यावेळी विजयदादा शांत होते. मग पवारांनी स्वत: विजयदादांना विचारणा केली, 'मी लढवायचं म्हटलं तर काय अडचण येईल का?' त्यावेळी विजयदादांनी सांगितले, 'तुम्ही लढणार असाल तर काहीच अडचण नाही'. बैठकीला छगन भुजबळ, जयंत पाटील होते. तेवढ्यात ही बातमी मला कळाली. मी लगेच बातमी दिली. त्यानंतर जयंत पाटील यांनी बाहेर येऊन तुम्ही काहीही बातमी चालवताय, अशी नाराजी व्यक्त केली. पण तीन तासानंतर पवारांनी बाहेर येऊन माढा मतदारसंघातून लढण्यास आग्रह होत असल्याचं सांगितलं आणि बातमी खरी ठरली.

दुसरा मुद्दा, करमाळ्यात एका सभेत धनगर समाजाचे मार्केट समितीचे चेअरमन बंडगर यांनी धनगर आरक्षणाची मागणी केली. तेव्हा तुम्ही कुठे आम्हाला मत दिलं. मत दिली नाही आणि आरक्षण आम्हाला का मागताय? असा सवाल पवारांनी विचारला. हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात फिरला. धनगर समाजातील नाराजी आणखीन वाढली. माढा मतदारसंघातील जातीय गणित पाहिलं तर सर्वाधिक ४० टक्के मराठा समाज आहे. त्यानंतर २४ टक्के धनगर, ११ टक्के माळी आणि मुस्लिम ४ टक्के आहेत. धनगर समाजाची मते महत्त्वपूर्ण आहेत. सोशल मीडियावर पवारांच्या नावाने संताप दिसून आला. 'माढा पवारांना पाडा', 'माढा पवारांना गाडा', अशा शब्दांनी सोशल मीडियावर थैमान घातलं. पवारांना मानणारा वर्ग चाळीशीनंतरचा आहे. तिशीतील तरूणांना पर्याय मिळालाय. त्याचं प्रतिबिंब सोशल मीडियातून दिसून येत होतं. पहिल्यांदाच पवारांना एवढा तीव्र विरोध झाला. शरद पवार सोशल मीडिया स्वतः हाताळतात. त्यामुळे त्यांनी अधिक गांभीर्यानं घेतलं.

पक्षातूनच पवारांवर रोष

त्यातच राष्ट्रवादीतील एका नेत्यानं सोशल मीडिया चालवणाऱ्या एजन्सीसोबत संपर्क साधला. शरद पवारांविरोधात सोशल मीडियावर प्रचार करण्याची बोलणी केली. पण संबंधित एजन्सीनं प्रचार करण्यास नकार दिला. ही गोष्ट पवारांना कळाली. त्यानंतर पवारांनी त्या नेत्याला बोलवून चांगल्याच शब्दांत सुनावलं. त्या नेत्यांनं पवारांसमोर कबूलही केलं. परंतु पक्षातूनच हरवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं पाहून शरद पवार अस्वस्थ झाले. मतदारांशी संपर्क राहिला नव्हता आणि ज्यांच्या भरवशावर निवडणूक लढवयाची तेच विरोधात प्रचार करत असल्याचं पवारांच्या लक्षात आलं.


शरद पवार

माघार घेण्याचं कारण पार्थ नव्हे

माघार घेताना कुटुंबात चर्चा करून निर्णय घेतला असल्याचं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. पण वस्तुस्थिती तशी नव्हती. जर पवार यांनी घरात चर्चा करूनच निर्णय घेतल्याचं जाहीर केलं तर मग रोहीत पवार यांनी फेरविचार करण्याची विनंती करणारी पोस्ट का टाकली? याचा अर्थ हा कुटुंबाचा नव्हे तर स्वतः शरद पवार यांचाच निर्णय होता. माढ्यातून माघार घ्यावी लागल्यानंतर पार्थचे नाव मावळसाठी निश्चित झाले. कुटुंबकलह कितीही असला तरी पवार घराण्यात अजूनही शरद पवार यांचाच अंतिम शब्द चालतो. अजित पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार हे वेगवेगळे मणी असले तरी एकाच माळेत गोवले गेले आहेत. अजित पवार हे शरद पवारांच्या सल्ल्यानुसारच काम करतात. त्यामुळेच अजित पवार यांनी अद्याप एकही शब्द काढला नाही.

तिसरा मुद्दा... राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे यांनी फलटणच्या भरसभेत घातलेला गोंधळ. वर्षभरापूर्वी शेखर गोरे यांनी राष्ट्रवादी तर्फे विधान परिषद लढविली. तिथे काँग्रेस-राष्ट्रवादीत बंडखोरी झाली. काँग्रेसकडून पतंगराव कदम यांचे बंधू मोहनराव कदम यांनी उमेदवारी दाखल केली आणि निवडून आले. वास्तविक सांगली आणि सातारामध्ये राष्ट्रवादीचं संख्याबळ जादा होतं तरी गोरे यांचा पराभव कसा झाला की त्यांना बळीचा बकरा बनवला, याचं उत्तर अजित पवार यांच्याकडे आहे. मुळात गोरे यांना डावलून पवारांनी प्रभाकर देशमुखांना मोठं केलं. देशमुखांनी कोणताही निर्णय घेताना गोरे यांना विश्वासात घेतलं नाही. त्यामुळेच भर सभेत गोरेंनी मोठ्या आवाजात विचारणा केली, 'माणमध्ये राष्ट्रवादीचं काय चाललंय?' पक्षाची कामे करण्यासाठी नेहमी गोरे पुढे असायचे आणि उपरा उमेदवार डोक्यावर आणून बसवल्यामुळे गोरेंची खदखद वाढली. त्यानंतर सोशल मीडियावर शरद पवारांच्या विरोधात नाराजीचा सूर निघाला. अनेकांनी व्हिडिओ करून पवारांना जाब विचारला. सोशल मीडियावरच पराभव झाल्याचं दिसत होतं. आता फक्त माघार घेण्याची औपचारिकता उरली होती. परंतु तरीही पवारांनी तीन वेळा सर्वे केला. तिन्ही वेळी नकारात्मक सर्वे आला. सगळे फासे पलटले होते. शरद पवारांचा मोहोळ आणि पंढरपूरचा दौरा १४ मार्च रोजी ठरला होता. परंतु अचानक ८ तारखेला मोहोळमधील पदाधिकाऱ्यांना पवारांचे फोन गेले, १४ तारखेचा दौरा होणार नसल्याच्या सूचना दिल्या. तिथंच काहीतरी घडतंय याची कुणकुण पदाधिकाऱ्यांना लागली आणि घडलं तसंच... पवारांनी अचानक ११ मार्च रोजी पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये बैठक बोलविली. बैठक सुरू होताच पवारांनी विजयदादांना सांगितलं, मी माढ्यातून निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत नाही. 'तुम्हीच लढवा' विजयदादा म्हणाले, 'पण तुमच्यासाठीची सगळी तयारी झालीय. मी निवडणूक लढवू शकत नाही'. बैठकीची बातमी मला लगेच कळाली. त्यानंतर बातमी दिली. काही वेळातच पवारांनी बाहेर येऊन तुम्ही आमच्या खाजगी बैठकांमध्ये डिस्टर्ब करता, असं वक्तव्य केलं. तरीही मी या बातमीवर ठाम होतो. थोड्याच वेळात पवारांनी बाहेर येऊन माघार घेण्याची घोषणा केली.

'गोधडी'नं 'गादी'ला धडा शिकवला

यापूर्वी विजयदादांचा पंढरपूरमधून पराभव झाला. खरंतर विजयदादांनी माढा विधानसभा मतदारसंघात तयारी केली होती परंतु ऐनवेळी पंढरपूरचं तिकीट दिलं. हातात दोनच दिवस होते. ताबडतोब निर्णय घ्यावा लागला. अजितदादांनी विजयदादांना चक्रव्यूहात अडकवलं. पवारांनी परिचारक यांना हाताला धरून विजयदादांना पाडलं. त्यानंतर २०१४ च्या लोकसभेला बबनदादा, दिपक आबा, परिचारक विरोधात होते. तरीही लोकसभेत मोदी लाटेतही विजयदादांचा विजय झाला. आता पुन्हा तेच घडतंय. माढ्यातील एका कार्यकर्त्यानं मला फोन केला. तो भरभरून बोलत होता. त्याला विचारलं की, कार्यकर्ते पवारांवर एवढे नाराज का आहेत? त्यावर त्यानं उत्तर दिलं, पवारांनी गादीवरच्या पदाधिकाऱ्यांना खुश केलं पण गोधडीवरच्या कार्यकर्त्यांना नाराज केलं. आम्हाला कधी संधी मिळणार? त्याच्या या शब्दांतून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये किती खदखद आहे ती दिसून आली.

सैनिक मूठभर, शिलेदार ढिगभर

संजय मामा शिंदे यांना लोकसभेसाठी भाजपने विचारणा केली. पण त्यांची करमाळ्यातून विधानसभा लढवण्याची इच्छा आहे. अशा वेळी राष्ट्रवादीही संजय मामा शिंदे यांच्यासाठी प्रयत्न करतेय. संजय मामा राष्ट्रवादीचे उमेदवार झाले तर त्यांचे बंधू बबनदादा शिंदे ताकद लावतील. परंतु विजयदादांचा गट नाराज होईल. संजय मामा यांचा माढा आणि करमाळामध्ये चांगला जनसंपर्क आहे. परंतु उर्वरित माण, खटाव, फलटण, कोरेगांव, सांगोला, माळशिरस आणि पंढरपूरमध्ये संपर्क नाही. त्याचा तोटा होईल. माढयातील राष्ट्रवादीत दिपक आबा साळुंके, बबनदादा शिंदे, प्रभाकर देशमुख असे शिलेदार पवारांनी गोळा केले परंतु लढण्यास सैनिक नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झालीय. अजित पवार यांनी या शिलेदारांना विजयदादांच्या विरोधात बळ दिलं. त्यातूनच विजयदादा आणि पवारांचे सरदार यांच्यात वितुष्ट निर्माण झालं.


रणजितसिंह मोहिते-पाटील

वादळापूर्वीची शांतता

शरद पवार आणि विशेषत अजित पवार यांना आपल्या ऐकण्यातली भक्तमंडळी आसपास हवी असतात. परंतु रणजितसिंह मोहीते पाटील हे अजित पवार यांच्या ऐकण्यातले नव्हते. कमी वयातच रणजित सिंह यांनी दाखवलेली चुणूक पवारांनी ओळखली. इथेच स्पर्धा सुरू झाली. पवारांची नवी पिढी मोठ्या झाडाखाली वाढू शकत नाही, हे पवारांनी ओळखलं आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांचं राजकारण संपवण्याचं काम केलं. पवारांची खासियत हीच आहे, ते माणसाला संपवत नाही तर माणसाचं काम संपवतात. कारण, माणसाचं काम संपवलं की माणूस आपोआप संपतो. त्यासाठी विशिष्ट कष्ट घेण्याची गरज नसते. ज्या जगमोहन डालमियांनी पवारांना बीसीसीआयच्या निवडणुकीत हरवलं. त्या डालमियांचं पुढे काय झालं हे जगजाहीर आहे. २०१३ पासून रणजिंतसिंह अडगळीत पडले आहेत. परंतु जर मुलगी सुप्रिया, पुतण्या अजित पवार, नातू पार्थ यांच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न असल्यामुळे शरद पवार चिंतीत होत असतील तर मग त्याला विजयदादा यांचा मुलगा रणजितसिंह अपवाद कसा? 'आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं' या म्हणीनुसार राष्ट्रवादीत आचरण सुरू असल्याचं दिसतंय. परंतु पुढील काही दिवसांतच रणजितसिंह निर्णय घेतील. येत्या काळात ते राजकारणात सक्रीय दिसतील. मात्र राष्ट्रवादी पक्ष सोडणार का? तो काळ ठरवेल. आणि पक्ष कोणता ती वेळ ठरवेल. भाजपकडून विजयदादा आणि रणजितसिंह यांना वर्षभरापूर्वीच ऑफर आली आहे. परंतु विजयदादांनी अद्याप विचार केला नाही. विजयदादांना उमेदवारी मिळाली नाही तर रणजितसिंह राष्ट्रवादीच्याच नेत्याविरोधात दंड थोपटतील. विशेष म्हणजे विजयदादांचे प्रत्येक पक्षात चांगले संबंध आहेत. अशा वेळी घड्याळाचे काटे उलटे फिरवण्यासाठी 'धनुष्यबाण'सुद्धा रणजितसिंहांच्या मदतीला येऊ शकतो. त्यानंतर मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवाराला माढा जिंकणं आणखी अवघड होऊन बसेल. रणजितसिंहांचा मार्ग स्पष्ट दिसत असला तरी विजयसिंह मोहिते-पाटील मात्र शांत आहेत. विजयदादा राजकारणाच्या विशिष्ट टप्प्यावर येऊन पोहोचले आहेत. एक पत्रकार म्हणून मला वाटतं की, विजयदादा निष्ठा आणि विचारधारेशी तडजोड करणार नाहीत. पक्षात अधिकच घुसमट झाली तर ते राजकारणातून निवृत्ती घेतील परंतु इतर पक्षात जाण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान विजयदादांनी अजून एकही शब्द पक्षाविरोधात काढला नाही. विशेष म्हणजे, मागील ४ दिवसांपासून विजयदादा राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यांच्या संपर्कात नाहीत. म्हणजे त्यांनी मनाशी काहीतरी पक्कं केलंय. पण ते नेमकं काय आहे. ही वादळापूर्वीची शांतता आहे का? हे येत्या दोन-तीन दिवसांत स्पष्ट होईल.

ज्या माढ्यातून २००९ मध्ये पवारांना ५ लाखांपेक्षा जास्त मते पडली होती. तिथे मागील दहा वर्षाच्या कालावधीत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. नव्हे तर, आश्वासन पाळली नसल्यामुळे पवारांनी कार्यकर्त्यांशी जोडलेला विश्वासर्हतेचा पूलच वाहून गेला. जेव्हा जनतेसमोर पर्याय नसतो तेव्हा गरज असते. परंतु जेव्हा पर्याय उपलब्ध असतात तेव्हा गरज नव्हे तर स्वेच्छा, आवड-निवड महत्त्वाची असते. जनतेने कौल दिलाय, आवडनिवडीचे संकेत दिले आहेत. तो कौल पवारांनी लवकर ओळखला. परंतु राष्ट्रवादीवर सध्या फाटाफूट आणि बंडखोरीचं ढग दाटले आहे. येत्या दोन दिवसात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीतील वातावरण अधिक खराब होण्याची शक्यता आहे. बंडखोर कार्यकर्त्यांचं वादळ घोंघावत येणार आहे. २०१९ ची निवडणूक शरद पवारांसाठी आत्तापर्यंतची सर्वात कठीण आणि आव्हानात्मक असेल. अचूक अंदाज ओळखणारे शरद पवार प्रतिकूल वातावरण अनुकूल करण्यात यशस्वी होणार का? लवकरच कळेल.