close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मोदी-शाहांचा विजय हा बंगालमधील चौथ्या राजकीय स्थित्यंतराची नांदी

भाजपाला मिळालेल्या अभूतपूर्व, ऐतिहासिक, अतिभव्य विजयात पश्चिम बंगालमध्ये मिळालेल्या विजयाचे वेगळे महत्त्व आहे.

Updated: May 24, 2019, 07:06 PM IST
मोदी-शाहांचा विजय हा बंगालमधील चौथ्या राजकीय स्थित्यंतराची नांदी

रामराजे शिंदेसह निनाद झारे, झी मीडिया : भाजपाला मिळालेल्या अभूतपूर्व, ऐतिहासिक, अतिभव्य विजयात पश्चिम बंगालमध्ये मिळालेल्या विजयाचे वेगळे महत्त्व आहे. ममता बॅनर्जी आणि डाव्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाने १८ जागा जिंकल्या. मोदी-शाहांचा हा विजय स्वातंत्र्योत्तर काळातील बंगालमधील चौथ्या राजकीय स्थित्यंतराची नांदी ठरणार आहे. निवडणुकीआधी इथं ममता विरुद्ध मोदी-शाह असा निकराचा संघर्ष झाला. या राजकीय संघर्षाला रक्तरंजित गालबोट लागलं. जाळपोळ, हिंसाचाराचा एवढा कहर झाला की निवडणूक आयोगाला एक दिवस आधीच प्रचारबंदी करावी लागली. मात्र लोकसभा निवडणूक निकालात ममता आणि डाव्यांची पुरती धूळधाण झाली. ज्या सिंगूर प्रकल्पाला विरोध करताना ममता बॅनर्जींनी माँ, माटी, मानुषचा नारा दिला, त्या हुगळी मतदारसंघातही भाजपाने तृणमूलचा धुव्वा उडवला. 'राम विरुद्ध काली' हा संघर्ष अखेर रामाने जिंकला असेच म्हणावे लागेल.

घटनाक्रम 

स्वातंत्र्योत्तर काळात साधारण १९७७ पर्यंत बंगालवर काँग्रेसची एकहाती सत्ता होती.
१९७७ नंतर जवळपास ३२ वर्षं डाव्या पक्षांवर बंगाली जनतेचा विश्वास कायम होता.
१० वर्षांपूर्वी डाव्यांचा हा गड ममता बॅनर्जींनी उद्धवस्त केला.
आणि यंदा मोदी लाटेवर स्वार होऊ बंगालच्या जनतेनं पुन्हा एकदा कूस बदलली.
२०१४ मध्ये ३९ टक्के मतं मिळवत तृणमूलचे ३४ खासदार निवडून आले होते.
२०१९ मध्ये तृणमूलला ४३ टक्के मतं मिळाली, पण तब्बल १२ जागांचं नुकसान झालं.
२०१४ मध्ये भाजपाला केवळ १७ टक्के मते मिळाली आणि २ खासदार निवडून आले. 
२०१९ मध्ये भाजपाने तब्बल ४० टक्के मतांवर आरूढ होत, पहिल्यांदाच १८ खासदार निवडून आणले.

2017 पासूनच भाजपा आणि तृणमूल दोन्ही पक्षांकडून प्रचारात धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाला. तृणमूलच्या हिंसक प्रचारला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तितकंच हिंसक उत्तर दिले. डाव्यांच्या पराजयाने रिक्त असलेली विरोधीपक्षाची जागाही भाजपाने कमावली आहे. आता पुढचे राजकारण ममतांच्या अस्तित्वाच्या दृष्टीनं महत्वाचे ठरणार आहे. राज्याचा विकास करण्यासाठी काँग्रेस आणि डाव्यांना बंगाली जनतेने तीन दशकांचा कालावधी दिला. पण ममता बॅनर्जींच्या बाबतीत जनता तेवढा वेळ थांबणार नाही, हेच ताज्या निकालानं अधोरेखित झाले आहे.