छत्रपती संभाजीनगरात धक्कादायक प्रकार! पैसे घेणाऱ्या मतदारांची यादीच छापली, पण नंतर घडलं ते जास्त चिंता वाढवणारं

Chhatrapati Sambhajinagar Voters List: छत्रपती संभाजीनगरमध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. मतदानाच्या नावानं मतदानासाठी पैसे घेत असल्याचा एक प्रकार बेगमपुरा भागात उघडकिस आला,  मतदारांची एक यादी समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आणि ही यादी पैसे घेणाऱ्यांची होती असे सांगण्यात आलं. नागरिकांनी आता यादीचे पोस्टरच लावले आहेत.  

शिवराज यादव | Updated: Jan 13, 2026, 01:11 PM IST
छत्रपती संभाजीनगरात धक्कादायक प्रकार! पैसे घेणाऱ्या मतदारांची यादीच छापली, पण नंतर घडलं ते जास्त चिंता वाढवणारं

Chhatrapati Sambhajinagar Voters List: छत्रपती संभाजीनगरमध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. मतदानाच्या नावानं मतदानासाठी पैसे घेत असल्याचा एक प्रकार बेगमपुरा भागात उघडकिस आला आहे. मतदारांची एक यादी समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आणि ही यादी पैसे घेणाऱ्यांची होती असे सांगण्यात आलं. नागरिकांनी आता यादीचे पोस्टरच लावले आहेत.इतकंच नाही तर आता या नागरिकांनी निषेध म्हणून मतदानच न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

नेमकं काय झालं?

मतदानाच्या नावानं मतदानासाठी पैसे घेत असल्याचा एक प्रकार  छत्रपती संभाजीनगरच्या बेगमपुरा भागात उघडकीस आला,  मतदारांची एक यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली. ही यादी पैसे घेणाऱ्यांची आहे असा दावा करण्यात आला. मात्र ही यादी कोणी बनवली? का बनवली? कुठल्या पक्षाच्या उमेदवाराने केली? हे कोणालाही माहिती नाही. 

संबंधित नागरिकांच्या लक्षात आलं असता त्यांनी यादीचे थेट पोस्टरच आपल्या भागामध्ये लावले आणि हे पैसे आम्ही घेतले नाही असं सांगितलं. इतकंच नाही तर आता आम्ही निषेध म्हणून मतदानही करणार नाही असा पवित्रा घेतला. यावेळी त्यांनी पैसे वाटप करणाऱ्यांचाही निषेध केला. 

संभाजीनगरमधील निवडणूक कशी आहे?

छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाड्याची राजधानी,  या शहरात ज्याची सत्ता तोच मराठवाड्यात राज्य करतो असं म्हटल्या जातं आणि हीच सत्ता काबीज करण्यासाठी आता सर्वपक्षीय धडपड सुरू आहे महापालिकेच्या निवडणुकांमुळे सर्वे पक्ष एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत,  महायुती झाली नाही महाविकास आघाडी विस्कटली त्यामुळे सगळेच एकला चलो च भूमिकेत आहे आणि त्यामुळे सर्वच पक्षांना एकमेकांचं मोठ आव्हान असणार आहे.

कोणात आहे लढत?

छत्रपती संभाजीनगरची महापालिकेची यावेळेची निवडणूक सर्वार्थानं वेगळी होतेय. संभाजीनगर महापालिकेच्या राजकारणात कायम जातीय धुव्रीकरणाचं राजकारण झालंय. खान हवा की बाण हवा अशी आरोळी देत बाळासाहेबांनी छत्रपती संभाजीनगर महापालिका काबीज केली होती. तेव्हापासून संभाजीनगर महापालिकेवर शिवसेना-भाजपचा भगवा फडकत राहिला.. सुरुवातीला शिवसेना मोठ्या भावाच्या भूमिकेत होती. पण नंतरच्या काळात राजकारण बदललं, शिवसेना फुटली. भाजप आता मोठ्या भावाच्या भूमिकेत असून त्यांनी यंदाच्या निवडणुकीत स्वबळाची चूल मांडलीये. छत्रपती संभाजीनगरात सख्खे मित्र पक्के वैरी म्हणून भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना होतोय. राष्ट्रवादीही स्वबळावर लढतेय. दुसरीकडं शिवसेना UBT आणि मनसे युतीत तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षही वेगळा लढतोय. 

संभाजीनगरच्या समस्या काय आहेत?

संभाजीनगर महापालिका अस्तित्वात आल्यापासून शहराला अनेक समस्यांनी ग्रासलंय. काही समस्या तर आक्राळविक्राळ रुप धारण करुन बसल्यात.

संभाजीनगरला 4 दिवसाआड पाणीपुरवठा होतो
अरुंद रस्त्यांमुळं वाहतूक कोंडींची समस्या
अनेक रस्त्यांवर स्ट्रिटलाईट नाहीत
कचरा उचलण्यात अनियमितता आहे
महापालिकेच्या तिजोरीत ठणठणाट आहे

संभाजीनगरचं राजकारण धार्मिक समीकरणांभोवती फिरत असलं तरी सगळेच पक्ष विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढत असल्याचं सांगतायेत.

स्वबळावर निवडणूक लढणा-या भाजपचं मनोबल उंचावलेलं आहे. भाजपमध्ये यावेळी उमेदवारीसाठी प्रचंड चढाओढ पाहायला मिळाली. 2014पासून संभाजीनगरमध्ये विकासगंगा आणल्याचा दावा भाजपनं केलाय. संभाजीनगरला औद्योगिक केंद्र म्हणून भाजपनं नावारुपाला आणल्यानं भाजपचा महापौर निवडून देण्याचं आवाहन भाजपनं केलंय.

संभाजीनगरच्या जनतेचा पाठींबा असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलाय. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंवर संभाजीनगरकरांनी कायम प्रेम केलंय. त्यामुळं जिंकतील तर ठाकरेच जिंकतील असा दावा ठाकरेंच्या पक्षानं केलाय. व्हिओ--4- संभाजीनगरमध्ये एमआयएमचा मोठा जनाधार आहे. संभाजीनगरमधून एमआयएमचे खासदार आमदार निवडून गेले होते. प्रस्थापितांना संभाजीनगरने संधी दिली आता एमआयएमला एक संधी द्या असं आवाहन एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केलंय.

संभाजीनगरची निवडणूक यावेळी थोडी वेगळी आहे. यावेळी हिंदुत्वाचा कैवार घेऊन एक नव्हे दोन नव्हे तीन तीन पक्ष रिंगणात आहेत. अशावेळी मतांचं दान कुणाच्या पारड्यात टाकायचं असा संभ्रम तिथल्या मतदारांमध्ये असणार आहे. तर एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी हे पक्षही अल्पसंख्याकाचे आम्हीच तारणहार आहोत या आवेशात मतांचा जोगवा मागतायेत. बहुरंगी लढतीत संभाजीनगरचा मतदारराजा कुणाच्या पारड्यात मतांचं दान टाकतो हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More