'झुकेगा नही साला', शिवसेना नेते अंबादास दानवेंची सूचक पोस्ट, 'आमच्याकडेही खातेपुस्तक आहे, हिशेब ठेवला जाईल'

Shivsena Leader Ambadas Danve Facebook Post: शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी फेसबुकला एक पोस्ट केली आहे. या पोस्टमधून त्यांनी आमच्याकडेही खातेपुस्तक आहे, हिशेब ठेवला जाईल असा इशारा दिला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 1, 2026, 07:05 PM IST
'झुकेगा नही साला', शिवसेना नेते अंबादास दानवेंची सूचक पोस्ट, 'आमच्याकडेही खातेपुस्तक आहे, हिशेब ठेवला जाईल'

Shivsena Leader Ambadas Danve Facebook Post: छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षामध्ये अंबादास दानवे विरुद्ध चंद्रकांत खैरे या दोघांतील संघर्ष उमेदवारी वरून उफाळून येण्याची शक्यता आहे. यादरम्यान अंबादास दानवे यांनी एक गंभीर आरोप केला आहे. छत्रपती  संभाजीनगर जिल्ह्यातील मंत्री शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांना माघारीसाठी धमकावत आहेत असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. वेळ आल्यावर व्याजसकट परतफेड ही निश्चित होणार असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

अंबादास दानवेंनी पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?

सत्ताधारी पक्षाचे गुलाम फोनाफानी करत सुटले आहेत. लक्षात ठेवा, आमच्याकडेही खातेपुस्तक आहे असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला आहे. आपले काम, नीतिमत्ता विसरून काम करणाऱ्यांचा बाजार मुळासकट उठवला जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

"छत्रपती  संभाजीनगर जिल्ह्यातील मंत्री शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांना माघारीसाठी धमकावत आहेत. यामध्ये काही अधिकारी उर्फ सत्ताधारी पक्षाचे गुलाम फोनाफानी करत सुटले आहेत. लक्षात ठेवा, आमच्याकडेही खातेपुस्तक आहे. हिशेब ठेवला जाईल. वेळ आल्यावर व्याजसकट परतफेड ही निश्चित होणार. आपले काम, नीतिमत्ता विसरून काम करणाऱ्यांचा बाजार मुळासकट उठवला जाईल," असं अंबादास दानवेंनी म्हटलं आहे. झुकेगा नही साला असंही त्यांनी अखेरीस म्हटलं आहे. 

चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंमध्ये वाद?

उमेदवारांची निवड करताना अंबादास दानवे यांनी मला डावलले. मला कोण उमेदवार आहेत, याचीही माहिती दिली नाही. आज मी ती सामनात यादी वाचली , हे सगळं अंबादास दानवे ठरवून करीत असल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांना याबद्दल कोणतीही कल्पना नाही. ते मुंबईच्या महापालिका निवडणुकीमध्ये बिझी आहेत. त्यामुळं अंबादास दानवे यांनी मनमानी करीत असल्याचं ते म्हणालेत. मी पक्षातला ज्येष्ठ नेता असूनही मला विचारले जात नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केलीये.

राज्यातील 29 महापालिकांमध्ये नेमकी काय स्थिती? कुठे महायुती तुटली, MVA चं कुठे जुळलं? स्वबळावर कोण लढतंय? वाचा संपूर्ण यादी

 

दरम्यान छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान झालेल्या एका गोंधळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झोन 1 चे निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांनी तांत्रिक कारणास्तव भाजपच्या एका महिला उमेदवाराचा अधिकृत 'बी-फॉर्म' नाकारल्याने गदारोळ झाला. व्हायरल व्हिडिओमध्ये कार्यकर्ते लतीफ पठाण यांना जाब विचारताना दिसत आहेत. 

'आमच्या कर्मचाऱ्याने दिलेला फॉर्म तुम्ही स्वीकारला, मग आता तो अर्जाला लावत का नाही? फॉर्म जोडायचा नव्हता तर तो परत का दिला नाही? असा सवाल कार्यकर्त्यांनी केला. पठाण यांनी आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, पण आक्रमक कार्यकर्त्यांपुढे त्यांचा निभाव लागला नाही. या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. तर अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक असे करण्यात आले असून, बी फॉर्म फाडून देण्यात आल्याचा आरोप भाजप शहराध्यक्ष किशोर शतोळे यांनी केला आहे. तर या व्हायरल व्हिडीओमागील सत्य काय आहे,याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी खुलासा केला आहे.

97 अर्ज बाद

छत्रपती संभाजीनगर  महापालिका निवडणुकीत 97 जणांचे अर्ज बाद झाले आहे, छाननीनंतर हे अर्ज बाद झाले आहेत,  शहरातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांत सकाळी 11 ला अर्जाची छाननी सुरू झाली. प्रक्रिया सुरु होताच एकानंतर एक धक्के बसायला सुरुवात आली. पक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या  उमेदवारांचे अर्ज किरकोळ कारणामुळे बाद झाले. दिवसभरात 97 जणांचे अर्ज बाद झाले आणि यातील अनेकांचा सरत्या वर्षातील शेवटच्या दिवशी 5  वर्षांसाठी राजकीय सूर्यही मावळला.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More