नवी दिल्ली : भारतात क्रिकेटचे अनेक चाहते आहेत. भारतीय टीमच्या विजयानंतर भारतीय फॅन्स जोरदार जल्लोष करतात. तर पराभवानंतर विरोध प्रदर्शन देखील करतात.
जगातली नंबर १ टेस्ट टीमची दक्षिण आफ्रिकेविरोधातली सुरुवात निराशाजनक ठरली. टीमच्या या कामगिरीमुळे एक चाहता इतका निराश झाला की त्याने स्वत:ला पेटवून घेतलं.
हा व्यक्ती भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीचा फॅन आहे. विराट कोहली पहिल्या टेस्ट सामन्यात स्वस्तात माघारी परतला. यामुळे निराश होऊन त्याने स्वत:ला पेटवून घेतलं. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मध्य प्रदेशचा राहणारा बाबूलाल बैरवा असं या व्यक्तीचं नाव आहे. ६३ वर्षांचे बैरवा हे रेल्वेचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार बैरवा आता रुग्णालयात दाखल आहेत. त्यांचं शरीर १५ टक्के भाजलं आहे. त्याचे हात आणि चेहरा यामध्ये भाजला आहे.
बाबूलाल बैरवा शनिवारी भारत-दक्षिण आफ्रिका यांचा सामना पाहत होते. कोहली फक्त ५ रनवर आऊट झाल्यानंतर भारताची स्थिती बिघडली त्यानंतर बैरवा यांनी हे पाऊल उचललं. पोलिसांना बैरवा यांनी सांगितलं की, कोहली आऊट झाल्यामुळे त्यांना स्वत:ला पेटवलं. पोलीस आता या प्रकरणाची चोकशी करत आहेत.