अजिंक्य देवांची हिंदी इंडस्ट्रीवर टीका 'बॉलिवूडने मला स्वीकारलं नाही' अजय-सनीचं घेतलं नाव

अजिंक्य देवांचा खुलासा 'हिंदीत अ‍ॅक्शन हिरो व्हायचं होतं, पण...'  

कावेरी पिंपळे | Updated: Nov 13, 2025, 02:33 PM IST
अजिंक्य देवांची हिंदी इंडस्ट्रीवर टीका 'बॉलिवूडने मला स्वीकारलं नाही' अजय-सनीचं घेतलं नाव

मराठी चित्रपटसृष्टीतील देखणा, व्यक्तिमत्ववान आणि बहुप्रतिभावान अभिनेता अजिंक्य देव यांनी पुन्हा एकदा आपल्या करिअरबद्दल खुलासा केला आहे. मराठी सिनेमांत अनेक वर्षे राज्य केलेले अजिंक्य देव आज पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकत आहेत. पण एक काळ असा होता की त्यांनी बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्शन हिरो बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं मात्र त्यांचं हे स्वप्न अपूर्ण राहिलं.

Add Zee News as a Preferred Source

‘कॅचअप’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अजिंक्य देव यांनी त्यांच्या त्या काळातील संघर्ष आणि अनुभव मोकळेपणाने शेअर केले. ते म्हणाले 'अ‍ॅक्शन हिरो व्हायचं म्हणून मी हिंदीत शिरलो होतो. प्रयत्न करत होतो. त्या काळात अक्षय कुमार, अजय देवगण, सनी देओल हे सगळे नव्यानेच इंडस्ट्रीत आले होते. आम्ही काही कामं एकत्र केली होती. अक्षयसोबत ‘पांडव’ सिनेमात मी काम केलं. पण बॉलिवूडमधील लोक मला नेहमी मराठी सिनेमातील मोठा स्टार म्हणूनच पाहायचे. त्यामुळे मला हिंदी इंडस्ट्रीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करता आलं नाही. खरं सांगायचं तर त्या काळातील लॉबीने मला आत येऊच दिलं नाही.'

ते पुढे म्हणाले 'माझ्या वडिलांनी ज्येष्ठ अभिनेते रमेश देव त्यांनी हिंदीत उत्तम काम करून आपली छाप निर्माण केली होती. नाना पाटेकर, डॉ. लागू यांसारख्या कलाकारांनीही तो बंध तोडला होता. पण माझ्या काळात परिस्थिती बदलली होती. त्या वेळी अनेक स्टारकिड्स आले होते कुमार गौरव, अजय देवगण, सनी देओल... आणि नंतर शाहरुख खानचा काळ सुरू झाला. स्पर्धा खूप वाढली होती.'

अजिंक्य देव यांनी आपल्या मर्यादाही प्रामाणिकपणे मान्य केल्या. ते म्हणाले 'मला वाटतं माझ्यातही काहीतरी कमी होतं. मी नृत्य शिकायला हवं होतं. कदाचित अधिक मेहनत घेतली असती तर मी त्या लॉबीचं बंधन तोडू शकलो असतो. पण त्या काळात माझं लक्ष बाबांच्या निर्मिती संस्थेकडेही होतं. त्यामुळे अभिनयापेक्षा इतर जबाबदाऱ्यांमध्ये मी गुंतून गेलो. थोडी निष्काळजीपणाही झाला असेल. पण आज मला त्या अनुभवांमधून खूप काही शिकायला मिळालं.'

अजिंक्य देव सध्या पुन्हा दोन्ही इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. ते नुकतेच ‘घरत गणपती’ आणि ‘मी आणि अमायरा’ या मराठी चित्रपटांत झळकले. प्रेक्षकांनी त्यांच्या अभिनयाचे कौतुकही केले. आता ते रणबीर कपूरसोबतच्या बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. तसेच नीतू कपूर आणि करिश्मा कपूरसोबतही ते एका नव्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. एकूणच, अजिंक्य देव यांनी आपल्या प्रामाणिकपणाने आणि जिद्दीने पुन्हा इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. मराठी आणि हिंदी दोन्ही चित्रपटसृष्टीत ते सध्या व्यग्र असून, त्यांच्या नव्या भूमिकांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

FAQ
अजिंक्य देव हिंदी चित्रपटसृष्टीत का यशस्वी झाले नाहीत?
अजिंक्य देव यांनी सांगितले की, बॉलिवूडमधील लॉबीने त्यांना स्वीकारले नाही. ते मराठी कलाकार म्हणून ओळखले जात असल्यामुळे हिंदी इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण करणं त्यांना कठीण झालं.

अजिंक्य देव यांनी कोणत्या प्रसिद्ध मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे?
त्यांनी ‘माहेरची साडी’, ‘माझं घर माझा संसार’, ‘सर्जा’, ‘कशासाठी प्रेमासाठी’ यांसारख्या अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

सध्या अजिंक्य देव कोणत्या प्रोजेक्ट्सवर काम करत आहेत?
सध्या ते रणबीर कपूरसोबतच्या ‘रामायण’ चित्रपटात झळकणार असून, नीतू कपूर आणि करिश्मा कपूर यांच्यासोबतही एका नव्या हिंदी प्रोजेक्टवर काम करत आहेत. तसेच मराठीत ‘घरत गणपती’ आणि ‘मी आणि अमायरा’ या चित्रपटांत त्यांनी काम केले आहे.

About the Author

kaveri pimpley

कावेरी पिंपळे सध्या ‘झी २४ तास डिजिटल’मध्ये कंटेंट एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पत्रकारितेचा चार वर्षांचा अनुभव आहे. ...Read More