22 Years After Sooryavansham Actress Death Complaint Filed: टॉलिवूडचे दिग्गज अभिनेते मोहन बाबू हे एका नव्या अडचणीत सापडले आहेत. मोहन बाबू हे त्यांचा धाकटा मुलगा मंचू मनोजमुळे वादात सापडले होते. आता थेट मोहन बाबू यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
आंध्र प्रदेशमधील खन्नम जिल्ह्यामध्ये मोहन बाबूंविरोधात तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्री सौंदर्याच्या मृत्यूप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबरोबर 'सूर्यवंशम' चित्रपटात सुनेची भूमिका साकारल्याने सौंदर्या ही दाक्षिणात्य अभिनेत्री घरोघरात पोहचली. कन्नड चित्रपटसृष्टीमधील या अभिनेत्रीने खरं तर हिंदीमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र 17 एप्रिल 2004 रोजी एका खासगी विमानाच्या अपघातात वयाच्या 31 व्या वर्षी सौंदर्याचं अपघाती निधन झालं.
सौंदर्या ही भारतीय जनता पार्टी आणि तेलगु देसम पार्टीच्या एका राजकीय प्रचाराच्या कार्यक्रमासाठी कारीमानगर येथे जात असतानाच तिच्या खासगी विमानाचा अपघात झाला. या अपघातामध्ये सौंदर्याच्या भावाचाही मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे अपघात झाला त्यावेळी सौंदर्या गरोदर होती आणि अपघातानानंतर तिचा मृतदेह सापडलाच नाही.
या घटनेला 22 वर्ष पूर्ण होत असतानाच आता सदर प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आल्याचं वृत्त 'न्यूज 18 कन्नड'ने दिलं आहे. 'सौंदर्याचा मृत्यू हा अपघाती नसून ही एक हत्या आहे. मोहन बाबूंबरोबर झालेल्या संपत्तीच्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे,' असं या तक्रारीत म्हटलं आहे. सौंदर्या आणि तिचा भाऊ अमरनाथ या दोघांनी शमशेदाबाद येथील जलपल्ली गावातील सहा एकर जमीन मोहन बाबूला विकण्यास नकार दिला.
'न्यूज 18 कन्नड'च्या वृत्तानुसार, दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये मोहन बाबू यांनी दोन्ही भावंडांवर ही जमीन विकण्यासाठी दबाव टाकला. तसेच अपघातानंतर ही जमीन मोहन बाबू यांनी बेकायदेशीपणे बळकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुळात हा विमान अपघात का झाला याचं ठोस कारण आजही समोर आलेलं नाही.
तक्रारदार व्यक्तीचं नाव चित्तीमल्लू असं असून त्यांनी खम्मामचे सहाय्यक पोलीस आयुक्त आणि खम्मामच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. सरकारने ही वादग्रस्त जमीन ताब्यात घ्यावी अशी मागणी करतानाच या जमिनीचा वापर अनाथ, शहीदांच्या कुटुंबियांसाठी आणि पोलीस खात्यातील लोकांबरोबरच प्रसारमाध्यमांसाठी केला जावा असं म्हटलं आहे.