Bollywood Popular Child Artist: हिंदी कलाजगतामध्ये आजवर अनेक कलाकारांनी त्यांचं नशीब आजमावलं. त्यातही 70 आणि 80 चं दशक गाजवलं ते म्हणजे बालकलाकारांनी. अनेक बड्या कलाकारांसोबत काही असे लहान कालकारही या काळात रुपेरी पडद्यावर झळकले ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. जाणून आश्चर्य वाटेल पण, काही चित्रपटांसाठी तर मध्यवर्ती भूमिकेत असणाऱ्या कलाकारांइतकंच मानधन या बालकलाकारांनाही देण्यात आलं होतं.
अशाच या बालकलाकारांच्या यादीतील एक नाव म्हणजे, मास्टर बिट्टू. तेव्हाचा हा बालकलाकार सध्या किती मोठा झालाय माहितीये? त्याचं वय आहे 56 वर्षं. सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, मात्र त्या फोटोंमध्ये तेव्हाच्या या मास्टर बिट्टूला ओळखताच आलं नाही.
मास्टर बिट्टू हे या कलाकाराचं कलाजगतातील नाव असलं तरीही त्याचं खरं नाव आहे विशाल देसाई. विशालनं रुपेरी पडद्यावर अनेक मोठ्या कलाकारांच्या बालपणीची भूमिका साकारली आहे. सुरेख अभिनय, चेहऱ्यावरचे निरासग भाव या कारणांमुळं त्याला कमाल प्रेक्षकपसंती मिळाली. अमिताभ बच्चन म्हणू नका, किंवा मग जितेंद्र म्हणू नका. मास्टर बिट्टूनं या कलाकारांचा बालपणीचा चेहराच जणू प्रेक्षकांना दाखवला असं म्हणणं गैर ठरणार नाही.
बालकलाकार म्हणून विशालनं खूप प्रसिद्धी मिळवली. मात्र मोठेपणी तो रुपेरी पडद्यापासून दुरावताना दिसला. मात्र पुन्हा एकदा या क्षेत्राच्या संपर्कात तो आलाच. विशाल सध्या कॅमेरासमोर नव्हे, तर कॅमेराच्या मागे राहून या क्षेत्रात योगदान देतोय. प्रोडक्शनशी संबंधित कामांमध्ये तो भरीव योगदान देत असून, 'कामिनी दामिनी' मालिकेसाठी त्यानं हेमा मालिनी यांना असिस्ट केल्याचं म्हटलं जातं. इतकंच नव्हे, तर अनेक चित्रपटांच्या क्रिएटीव्ह आणि असिस्टंट डिरेक्टर अर्थात सहायक दिग्दर्शक म्हणूनही त्यानं काम पाहिलं आहे.