बॉलिवूड अभिनेता अदर जैन आणि आलेखा अडवाणी 21 फेब्रुवारी 2025 रोजी विवाहबंधनात अडकले. अत्यंत थाटामाटात हे लग्न पार पडलं होतं. जवळपास आठवडाभर चाललेल्या या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आलेखा अडवाणीशी लग्न करण्याआधी अदर जैन अभिनेत्री तारा सुतारियाशी प्रेमसंबंधात होता. 2019 ते 2023 दरम्यान दोघांनी एकमेकांना डेट केलं. मात्र नंतर दोघांचा ब्रेकअप झाला. लग्न होण्याच्या आधीपासूनच अदर जैन आणि आलेखा अडवाणी एकत्र होते.
लग्न सोहळ्यात अदर जैनने आलेखाप्रती भावना व्यक्त करणारं एक भाषण केलं होतं. यावेळी त्याने मी 'गेल्या 20 वर्षांपासून टाइमपास करत होतो' असं म्हटलं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अदर जैनने अप्रत्यक्षपणे तारा सुतारियाला टार्गेट करत असंवेदनशील विधान केल्याने अनेकांनी त्याला फटकारलं. तसंच आलेखासाठी तिची फसवणूक केल्याबद्दल सुनावलं.
त्या विधानावरुन टीका झाल्यानंतर अदर जैनने ETimes शी संवाद साधताना यावर स्पष्टीकरण दिलं असून, चुकीचा अर्थ लावल्याचा दावा केला आहे. अदरने सांगितलं आहे की, 'तुम्ही तो व्हिडीओ पुन्हा पाहा. मी 20 वर्षं म्हटलं आहे'.
तो पुढे म्हणाला, "या परिस्थितीत पहिल्या दिवसापासूनच खूप काही लिहिलं गेलं आहे. आदरापोटी, सर्वजण त्याबद्दल गप्प आहेत. मग लोक त्यांना जे हवे ते बोलण्याचे स्वातंत्र्य घेतात. हे तिच्या (आलेखाकडे बोट दाखवत) आणि तिच्या कुटुंबासाठी, मी आणि माझे कुटुंब आणि तिच्या (ताराकडे निर्देश करत) आणि तिच्या कुटुंबासाठी अन्याय्य आहे. त्यात काहीही तथ्य नाही. वस्तुस्थिती अशी आहे की ती (अलेखा) माझ्या आयुष्यातील सर्वात जुन्या मैत्रिणींपैकी एक आहे. मी तिचा सर्वात जुना मित्र आहे. जे काही लिहिलं गेले आहे, त्यामागे कोणतेही सत्य नाही. आपण ज्या कुटुंबातून आलो आहोत, त्या कुटुंबांमध्ये आपल्याला शिकवले गेलं आहे की समाजाच्या कोणत्याही क्षेत्रातून आलेले असले तरी सर्व स्तरातील प्रत्येकाचा आदर करावा; वर्ग आणि दर्जा आमच्यासाठी महत्त्वाचा नाही. आपण सर्वांचा आदर करतो, आपण सर्वांवर प्रेम करतो आणि आपण सर्वांची काळजी घेतो".
"त्यांनी माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला आणि त्यातील फ्कत 10 सेकंद घेतले. मग लोक त्याबद्दल स्वतःचे मत बनवतात. लोकांनी ते काहीतरी वेगळेच बनवले आहे आणि ते दुसऱ्या कोणाकडे वळवले आहे. माझ्या पालकांनी मला नेहमीच माझ्या भूतकाळाचा, माझ्या वर्तमानाचा आणि माझ्या भविष्याचा आदर करायला शिकवले आहे. म्हणूनच आम्ही अशा प्रकारे वाढलो आहोत आणि आम्हाला ते कोणाकडे वळवायचे नव्हते. मी लग्न करताना दुसऱ्या कोणाचाही विचार करणार नाही. जे घडले ते दुर्दैवी आहे. पण त्यामागे कोणतेही सत्य नाही," असंही तो म्हणाला आहे.
अदरने असंही नमूद केले की कधीकधी, दोन लोकांमध्ये काही गोष्टी जुळत नाहीत आणि ते ठीक आहे. प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो आणि जर नातं तुटले तर याचा अर्थ असा नाही की कोणी मागे फिरेल आणि इतर लोकांबद्दल गोष्टी बोलू लागेल असंही तो म्हणाला.