'शाहरुख, सलमानने माझं करिअर संपवण्यासाठी....', आमीर खानने पहिल्यांदाच केला खुलासा, 'दंगल चित्रपटाच्या वेळी...'

आपण दंगल (Dangal) चित्रपट स्विकारताना थोडेसे घाबरत होतो. शाहरुख (Shahrukh Khan) आणि सलमान (Salman Khan) यांचा यामागे काहीतरी हेतू असावा अशी आपल्याला भिती होती असा खुलासा आमीर खानने (Aamir Khan) केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Mar 25, 2025, 07:32 PM IST
'शाहरुख, सलमानने माझं करिअर संपवण्यासाठी....', आमीर खानने पहिल्यांदाच केला खुलासा, 'दंगल चित्रपटाच्या वेळी...'

बॉलिवूडमध्ये परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असणारा अभिनेता आमीर खानचा (Aamir Khan) दंगल (Dangal) चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. कुस्तीपटू महावीर सिंग फोगाट (Mahavir Singh Phogat) आणि त्यांच्या दोन मुली गीता आणि बबिता यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं होतं. जगभरातून चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान नुकतंच आमीर खानने या चित्रपटाबद्दल बोलताना एक खुलासा केला आहे. शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि सलमान खानने (Salman Khan) माझं करिअर संपवण्याच्या हेतूने नितीश कुमार यांना माझ्याकडे पाठवलं असावं असा माझा समज झाल्याचं आमीर खानने सांगितलं आहे.  

'जस्ट टू फिल्मी' या पॉडकास्टमध्ये आमीरला तो चित्रपटांची निवड कशी करतो असं विचारण्यात आलं. त्यावर त्याने तो नेहमीच प्रेक्षकांना काय हवे आहे किंवा ट्रेंड्सचा विचार न करता त्याच्या इंस्टिंक्टनुसार जातो.

'मी ट्रेंडवर विश्वास ठेवत नाही'

"मुख्य प्रवाहातील चित्रपटसृष्टीतील बरेच जण लोकांना काय आवडतं ते पाहतात आणि त्याचा फायद उचलण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही इतकी मेहनत घेत असताना, इतका वेळ आणि पैसा खर्च करत असताना ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. प्रेक्षकांना जर चित्रपट आवडला नाही तर काय? असा विचार येणं साहजिक आहे. ही एक रास्त चिंता आहे. पण एक क्रिएटिव्ह व्यक्ती म्हणून, मी असा विचार करत नाही. जेव्हा मला एखादी कथा खूप आवडते तेव्हा मी त्यात मनापासून लक्ष घालतो आणि विश्वास ठेवतो की प्रेक्षक एक माणूस म्हणून मी कथेला जशी पाहतो तशीच प्रतिक्रिया देतील," असं त्याने म्हटलं. 

'...मला वाटलं शाहरुख, सलमानने माझं करिअर संपवण्यासाठी नितीशला पाठवलं'

दंगल चित्रपटाबद्दल बोलताना आमीरने सांगितलं की, "जेव्हा नितीश तिवारी माझ्याशी चर्चा कऱण्यासाठी आले तेव्हा मी त्यांना हा चांगला चित्रपट असून मला करायची इच्छा आहे, पण आता करु शकत नाही असं सांगितलं. मी नुकताच धूम 3 चित्रपट केला होता आणि सर्वोत्तम दिसत होतो. माझं बॉडी फॅट 9.67 आहे आणि तुमची मी 55 वर्षांच्या, 4 मुलींच्या वडिलांची भूमिका करण्याची इच्छा आहे". 

नंतर त्याने उपहासात्मकपणे म्हटलं की, शाहरुख आणि सलमानने मुद्दामून नितीशला माझ्याकडे पाठवलं आहे का अशी मला शंका आली. 60 वर्षाच्या वडिलांची भूमिका देऊन मला इंडस्ट्रीतून बाहेर काढण्याची योजना आहे का? असं मला वाटलं. मी नितीशला 10.15 वर्षांनी येण्यास सांगितलं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यानेही ते मान्य केलं असंही त्याने सांगितलं.

दंगल चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. दंगल हा वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी भाषेतील चित्रपट ठरला, ज्याने जगभरात 2000 कोटी कमावले.

आमिर आता  'तारे जमीन पर' या चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या 'सीतारे जमीन पर' मध्ये दिसणार आहे. तीन वर्षांनंतर हा त्याचा पहिला चित्रपट आहे, जो या वर्षी प्रदर्शित होईल. अधिकृत रिलीज तारीख जाहीर केलेली नाही.