'आर्यन जेलमध्ये सुरक्षित नव्हता, त्याला 3500 गुन्हेगारांनी...', एजाज खानचा धक्कादायक खुलासा, 'त्याला सिगारेट...'

नेहमी वादात अडकणारा अभिनेता एजाज खान (Ajaz Khan) ड्रग्ज केस प्रकरणात आर्थर रोड जेलमध्ये (Arthur Road Jail) होता. याचवर्षी आर्यन खान (Aryan Khan) आणि राज कुंद्रा (Raj Kundra) यांना अटक करण्यात आली होती.   

शिवराज यादव | Updated: Mar 20, 2025, 06:39 PM IST
'आर्यन जेलमध्ये सुरक्षित नव्हता, त्याला 3500 गुन्हेगारांनी...', एजाज खानचा धक्कादायक खुलासा, 'त्याला सिगारेट...'

बॉलिवूड अभिनेता एजाज खान (Ajaz Khan) हा आपल्या अभिनयापेक्षा वादासाठी जास्त ओळखला जातो. बिग बॉससारख्या अनेक रिअॅलिटी शोमधून तो झळकत असतो. 2021 मध्ये त्याला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती. यानंतर त्याची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये (Arthur Road Jail) करण्यात आली होती. याचवर्षी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. तसंच राज कुंद्रा (Raj Kundra) याला पॉर्नोग्राफी कंटेंट प्रकरणी अटक करण्यात आली होती. 

नुकत्यात एका मुलाखतीत, एजाज खानने या तुरुंगांमध्ये कोणत्या प्रकारचं वातावरण असतं आणि कशाप्रकारे त्याने राज कुंद्रा आणि आर्यन खान यांना मदत केली आणि त्यांना माफियांपासून कसे वाचवले याबद्दल सांगितलं. 

एजाज खानने आपण राज कुंद्राला कशाप्रकारे मदत केली याचा खुलासा करताना सांगितलं की, "राज कुंद्रा मला दर दिवशी मेसेज पाठवत असे. त्याला अत्यंत कडक पहाऱ्यात आणि देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. राज कुंद्रा आला तेव्हा मला जेलमध्ये सात महिने झाले होते. त्याने मला मदत केली नाही, पण मी त्याची फार मदत केली. मग ते बिस्कीट, बिस्लेरी किंवा सिगारेट असो. जेलमध्ये या गोष्टी उपलब्ध करुन देणं फार मोठी गोष्ट आहे. तो मला पाणी, ब्रेड आणि बिस्किटसाठी विचारत असे. तिथे साधं पाणी मिळत असे, पण बिस्लेरी नाही. पण आपण आजारी पडू या भितीने तो पित नसे".

पण राज कुंद्रा आपण केलेली मदत विसरला असं सांगत त्याने आपली नाराजीही जाहीर केली. "त्याचा चित्रपट (UT69) फ्लॉप झाला, कारण त्याने त्यात सर्व खोटं दाखवलं. त्याने त्याची बाजू सांगितली. पण त्याला दिसलेली माणुसकी, जे सहन करावं लागलं ते दाखवलं नाही. त्याला जेलमध्ये मदत करणारा हिरोही त्याने दाखवला नाही. जेलच्या अधिक्षकांचे कडक आदेश असतानाही मी त्याला पाणी, ब्रेड, बटर दिलं. पण त्याने त्या उपकाराची परतफेड केली नाही. त्याने चित्रपटातील माझी भूमिका छाटली. त्याने मी त्याच्यासाठी काय केलं हे दाखवलच नाही". 

अशाच प्रकारे, एजाज खानने आर्यन खानला मदत केल्याचा दावा केला आहे. तुरुंगात सुमारे 3500 गुन्हेगार होते आणि त्या गर्दीत तो नक्कीच सुरक्षित नव्हता असं त्याने म्हटलं आहे. त्याने सांगितलं की, "शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानदेखील त्यावेळी तुरुंगात होता. मी त्यालाही मदत केली आहे आणि त्याला पाणी, सिगारेट पाठवली. तुरुंगात असलेल्या व्यक्तीसाठी तुम्ही एवढेच करू शकता. आणि हो, मी त्याला गुंड आणि माफियापासून देखील वाचवले. तो धोक्यात होता, त्याला सामान्य बॅरेकमध्ये ठेवण्यात आले होते".