Pune Accident: 3 महिन्यांचं लेकरू पोरकं झालं, नवले ब्रीज अपघातात 30 वर्षीय मराठी अभिनेत्याचा मृत्यू

गुरुवारी पुण्यातील नवले ब्रीज परिसरात झालेल्या भीषण अपघातात 30 वर्षीय मराठी अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे.   

सोनेश्वर पाटील | Updated: Nov 15, 2025, 08:05 PM IST
Pune Accident: 3 महिन्यांचं लेकरू पोरकं झालं, नवले ब्रीज अपघातात 30 वर्षीय मराठी अभिनेत्याचा मृत्यू

Pune Navale Bridge Accident : पुण्यातील नवले ब्रीज परिसरात गुरुवारी झालेल्या भीषण अपघातामुळे संपूर्ण शहर हादरले आहे. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. त्यातच आता आणखी एक धक्कादायक गोष्ट उघडकीस आली आहे. या दुर्घटनेत 30 वर्षीय मराठी अभिनेता धनंजय कोळी याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Add Zee News as a Preferred Source

गुरुवारी दुपारी पुण्यातील नवले पुलाजवळ दोन जड वाहने एकमेकांना धडकली. धडकेची तीव्रता इतकी होती की वाहने नियंत्रणाबाहेर जाऊन अन्य गाड्यांवर आदळली. याच गोंधळात मराठी अभिनेता धनंजय कोळीची कार दोन वाहनांच्या मधोमध अडकली आणि क्षणातच तिचा चुराडा झाला. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

तीन महिन्यांपूर्वीच झाला होता मुलगा

धनंजय कोळीच्या वैयक्तिक आयुष्यात नुकतीच नव्या अध्यायाला सुरुवात झाली होती. फक्त तीन महिन्यांपूर्वीच त्याला मुलगा झाला होता. अपघाताच्या वेळी धनंजय एकटाच होता. त्याची पत्नी आणि बाळ लातूर येथे होते तर आई-वडील पुण्यात राहतात. धनंजय आई-वडिलांना भेटण्यासाठी पुण्याकडे येत होता. मात्र, मधेच हा जीवघेणा अपघात झाला.

धनंजय कोळी हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरचा रहिवासी होता. गेल्या काही वर्षांपासून तो पिंपरी-चिंचवडमधील चिखली भागात राहत होता.
अभिनयाची आवड असल्यामुळे त्याने अनेक नाटकांत भूमिका केल्या होत्या. आपल्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरही त्याने स्वतःला अभिनेता अशी ओळख देत कला क्षेत्राशी जोडलेले होते.

वाहतूक व्यवसायात सहा महिन्यांपूर्वी प्रवेश

अभिनयासोबतच धनंजय गेल्या सहा महिन्यांपासून वाहतूक व्यवसायही सांभाळत होता. त्यापूर्वी तो एका खासगी कंपनीत कार्यरत होता. कुटुंबाचा आर्थिक भार कमी करण्यासाठी त्याने व्यवसाय सुरू केला होता.

मात्र, अचानक आलेल्या या दुर्घटनेने कोळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नवविवाहित दांपत्याचा संसार उध्वस्त झाला असून तीन महिन्यांच्या बालकाच्या डोक्यावरून वडिलांची सावली कायमची नाहीशी झाली आहे. नवले पुलाजवळ घडणारे अपघात हा गंभीर चिंतेचा विषय बनला असून या घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

FAQ

1. नवले ब्रीजवरील अपघातात नेमकं काय घडलं?

पुण्यातील नवले ब्रीजजवळ गुरुवारी दोन जड वाहनांची जोरदार धडक झाली. धडकेनंतर वाहने अनियंत्रित होऊन इतर गाड्यांवर आदळली. याच गोंधळात अभिनेता धनंजय कोळी यांच्या कारचा चुराडा झाला आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

2. या अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?

एकूण आठ जणांचा मृत्यू झाला असून त्यात मराठी अभिनेता धनंजय कोळी यांचाही समावेश आहे.

3. धनंजय कोळी कोण होते?

धनंजय कोळी हे 30 वर्षीय मराठी अभिनेता होते. त्यांनी नाटकांत काम केले होते आणि इन्स्टाग्रामवर स्वतःला अभिनेता अशी ओळख दिली होती.

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More