Mi Nathuram Godse Boltoy Drama : गेल्या अनेक वर्षांपासून नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमात सक्रीय असलेले मराठी अभिनेते म्हणून शरद पोंक्षे यांना ओळखले जाते. शरद पोंक्षेंची प्रमुख भूमिका असलेले ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक चांगलंच गाजलं. मात्र सहा वर्षांपूर्वी या नाटकाचे प्रयोग थांबवण्यात आले होते. त्यानंतर प्रेक्षकांच्या आग्रहाखातर बहुचर्चित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर अवतरलं. पण आता हे नाटक कायमस्वरुपी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. शरद पोंक्षेंनी याबद्दलची माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पोंक्षे यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी नथुराम गोडसे या नाटकाचे एक पोस्टर पोस्ट केले आहे. या पोस्टरवर नथुराम गोडसेच्या भूमिकेत शरद पोंक्षे असे लिहिण्यात आले आहे. यासोबतच त्यांनी येत्या 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नथुराम गोडसे या नाटकाचा शेवटचा प्रयोग रंगणार आहे. नथुराम गोडसे या नाटकाचा शेवटचा प्रयोग मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात दुपारी 4 वाजता होईल, असे त्यांनी सांगितले आहे. 


शरद पोंक्षे यांची पोस्ट


"२५ वर्षांचा हा प्रवास आता संपणार. अतिशय खडतर संघर्षमय होता. असंख्य लोकांचे मुखवटे चेहरे ह्या काळात पहायला मिळाले. पण रसिकहो तुम्ही मात्र फक्त प्रेमच दिलत, तुमच्यामुळेच हे शक्य झालं. १२०० च्या वर प्रयोग २५ वर्षात केले. आता थांबायची वेळ आलेय. २५ रात्र ८ शिवाजी मंदिर व २६ दू ४.३० कालीदास मुलूंड समारोप. हे वादळ शांत होईल. कायमच", असे शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. 



शरद पोंक्षे यांनी हे नाटक अनेक वर्ष केले. या नाटकाचे लेखन प्रदीप दळवी यांनी केले होते. तर विनय आपटे यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले होते. या नाटकादरम्यान त्यांना धमकीचे फोनदेखील आले होते. मात्र त्यांनी आणि नाटकाच्या पूर्ण टीमने न घाबरता या नाटकाचे प्रयोग सुरु ठेवले. या नाटकाने 1000 प्रयोग केले. महाराष्ट्राचं नव्हे तर गोव्यातदेखील या नाटकाने हाऊसफुल्लचे बोर्ड बघितले. पण ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक वादविवादात अडकल्यामुळे थांबवावे लागले होते. 


फक्त 50 प्रयोगांसाठी रंगभूमीवर


त्यानंतर तब्बल सहा वर्षांनी हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर अवतरले. या नाटकाचे 50 प्रयोग पार पडले. या नाटकाचा दौरा अमेरिकेसह परदेशात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. फक्त 50 प्रयोगांसाठी पुन्हा रंगभूमीवर अवतरलेल्या या नाटकाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या नव्या नाटकाचे दिग्दर्शन विवेक आपटे करत होते. तर उदय धुरत हे सादरकर्ते होते. तर माऊली नाट्यसंस्थेतर्फे या नाटकाची निर्मिती करण्यात आली होती.