)
Konkan : कोकण म्हटलं की प्रत्येकाला आठवतो तो म्हणजे समुद्रकिनारा. निळाशार समुद्रकिनारा आणि नारळी-पोफळीच्या बागा, लाल मातीची धरती आणि चिरेबंदी वाड्यांनी सजलेलं कोकण. महाराष्ट्राचं हे निसर्गरम्य रत्न नेहमीच चित्रपटसृष्टीचं आवडतं लोकेशन राहिलं आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटांनंतर आता साऊथ सिनेसृष्टीही कोकणच्या प्रेमात पडली आहे.
गेल्या काही वर्षांत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांचं चित्रीकरण कोकणात झालं. पण आता साऊथ इंडस्ट्रीलाही या भूमीचं सौंदर्य भुरळ घालत आहे. याचाच प्रत्यय रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे गावात सध्या सुरू असलेल्या दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री कीर्ती सुरेश यांच्या ‘रावडी जनार्दन’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमुळे आला आहे.
सैतवडे गावातील ‘द मॉडेल इंग्लिश स्कूल’च्या मैदानावर जिल्हाधिकारी कार्यालयाचा भव्य सेट उभारण्यात आला आहे. ‘रावडी जनार्दन’ या चित्रपटाचं कथानक इ.स. 1900 मधील ब्रिटिश राजवटीच्या काळावर आधारित आहे. त्यामुळे त्या काळाचा भव्य सेट गावात उभा करण्यात आला असून, समुद्रकिनाऱ्यावरही अनेक दृश्यांचं शूटिंग सुरू आहे.
गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या चित्रीकरणामुळे सैतवडे गाव आणि परिसरात उत्साहाचं वातावरण आहे. गावकऱ्यांपासून ते शेजारच्या भागातील लोकांपर्यंत अनेक जण शूटिंग पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर पुढील शेड्युल वरवडे गावात पार पडणार आहे.
यापूर्वीही कोकणाने अनेक चित्रपटांच्या सौंदर्यात भर घातली आहे. ‘मुंजा’ या अलीकडच्या बॉलिवूड चित्रपटाचं काही चित्रीकरण कोकणात झालं आहे. ‘थ्री ऑफ अस’ हा चित्रपट वेंगुर्ल्यात चित्रित झाला. ‘उनाड’ गुहागरमध्ये तर ‘सुभेदार’, *‘शेरशिवराज’*चे काही भाग रत्नागिरीत शूट झाले.
तसेच ‘श्यामची आई’ दापोली आणि रत्नागिरीत, तर ‘प्रीतम’, ‘पिकोलो’, ‘पांघरुण’, ‘पिकासो’, ‘आपडी थापडी’, ‘टाइमपास 2’, ‘सायकल’ या अनेक मराठी चित्रपटांचे भाग विजयदुर्ग, कणकवली, कुडाळ, भोगवे, गुहागर आणि पालशेत परिसरात चित्रित झाले.
कोकणातील शांत, सुंदर आणि ऐतिहासिक वातावरणामुळे निर्माते या भागाकडे आकर्षित होत आहेत. सध्या मराठी, हिंदी आणि दक्षिण भारतीय निर्माते कोकणात शूटिंगसाठी परवानगी मिळवण्यासाठी रांगा लावत आहेत. स्थानिकांसाठी हे केवळ अभिमानाचं नव्हे तर रोजगार आणि पर्यटन वाढीचं नवं दालन ठरत आहे.
FAQ
कोकण परिसर सिनेसृष्टीसाठी का लोकप्रिय ठरलं आहे?
कोकणचं निळाशार समुद्रकिनारं, नारळी-पोफळीच्या बागा, लाल मातीची धरती आणि चिरेबंदी वाड्या यांसारखं निसर्गरम्य आणि ऐतिहासिक वातावरण सिनेमासाठी आदर्श आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटांनंतर आता साऊथ इंडस्ट्रीही या सौंदर्याने भुरळ घातली आहे, ज्यामुळे शूटिंगसाठी परवानग्या मागण्यासाठी रांगा लागत आहेत.
‘रावडी जनार्दन’ चित्रपटाचं शूटिंग कोकणात कुठे सुरू आहे आणि त्याचं कथानक काय?
विजय देवरकोंडा आणि कीर्ती सुरेश अभिनीत ‘रावडी जनार्दन’ चित्रपटाचं शूटिंग रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे गावात सुरू आहे. कथानक इ.स. १९०० च्या ब्रिटिश राजवटीवर आधारित असून, ‘द मॉडेल इंग्लिश स्कूल’ मैदानावर जिल्हाधिकारी कार्यालयाचा भव्य सेट उभारण्यात आला आहे. पुढील शेड्यूल वरवडे गावात होईल.
कोकणात यापूर्वी कोणत्या चित्रपटांचं शूटिंग झालं?
कोकणात ‘मुंजा’, ‘थ्री ऑफ अस’ (वेंगुर्ला), ‘उनाड’ (गुहागर), ‘सुभेदार’, ‘शेरशिवराज’ (रत्नागिरी), ‘श्यामची आई’ (दापोली-रत्नागिरी), ‘प्रीतम’, ‘पिकोलो’, ‘पांघरुण’, ‘पिकासो’, ‘आपडी थापडी’, ‘टाइमपास २’, ‘सायकल’ (विजयदुर्ग, कणकवली, कुडाळ, भोगवे, गुहागर, पालशेत) सारख्या मराठी चित्रपटांचं शूटिंग झालं आहे.