बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारने सहकलाकार परेश रावल यांच्याविरोधात 25 कोटींचा नुकसानभरपाईचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. परेश रावल यांनी 'हेरा फेरी 3' चित्रपट सोडल्याने चित्रीकरणात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप आहे. परेश रावल यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून चित्रपटातून बाहेर पडत असल्याची पुष्टी केल्यानंतर दोन दिवसांनी अक्षय कुमारने हे पाऊल उचललं असल्याचं वृत्त 'हिंदुस्तान टाईम्स'ने दिलं आहे.
18 मे रोजी परेश रावल यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत, क्रिएटिव्ह मतेभद किंवा पैशांच्या मुद्द्यांवरुन चित्रपट सोडला नसल्याचं सांगितलं आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "हेरा फेरी 3 मधून बाहेर पडण्याचा माझा निर्णय क्रिएटिव्ह मतभेदांमुळे नव्हता हे मी सांगू इच्छितो. मी पुन्हा सांगतो की चित्रपट निर्मात्याशी कोणताही क्रिएटिव्ह मतभेद नाही. चित्रपट दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्याबद्दल मला अपार प्रेम, आदर आणि विश्वास आहे."
I wish to put it on record that my decision to step away from Hera Pheri 3 was not due to creative differences. I REITERATE THAT THERE ARE NO CREATIVE DISAGREEMENT WITH THE FILM MAKER . I hold immense love, respect, and faith in Mr. Priyadarshan the film director.
— Paresh Rawal (@SirPareshRawal) May 18, 2025
या चित्रपटासाठी परेश रावल यांना त्यांच्या नेहमीच्या मानधनापेक्षा तिप्पट जास्त मानधन देण्यात आल्याची माहिती आहे. अक्षय, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांनी यावर्षी एप्रिलमध्ये चित्रपटाचं चित्रीकरण सुरू केलं होते. अक्षय 'हेरा फेरी 3' चा निर्माते देखील आहे. त्याने निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्याकडून कायदेशीररित्या हक्क खरेदी केले आहेत.
याआधी परेश रावल यांनी स्वत: एक्सवर पोस्ट शेअर करत आपण चित्रपटाचा भाग असू असं सांगितलं होतं. "परेश यांनी स्वतः जानेवारीमध्ये त्यांच्या एक्स हँडलवर चित्रपट करत असल्याची घोषणा केली होती. त्यांनी सर्व प्री-प्रोडक्शन प्लॅनिंगमध्ये भाग घेतला होता, एक दिवस (टीझर प्रोमोसह) स्वेच्छेने शूट केले होते. जर कोणतीच नाराजी नसेल तर मग आता अचानक त्यांनी या फ्रँचायझीच्या चाहत्यांच्या भावनांशी खेळणं आणि निर्मात्याचं नुकसान करणं हे स्पष्टपणे वाईट आहे," असं एका सूत्राने हिंदुस्तान टाईम्सला सांगितलं आहे.
"परेश यांनी व्यावसायिक सचोटी किंवा व्यावसायिक नैतिकतेचा उघडपणे अवमान केला. जर त्यांना चित्रपट करायचा नव्हता, तर त्यांनी कायदेशीर करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी, स्वाक्षरीची रक्कम स्वीकारण्यापूर्वी आणि निर्मात्याला शूटिंगवर इतके पैसे खर्च करायला लावण्यापूर्वी तसे सांगितले पाहिजे होते," असं या प्रकरणातील कायदेशीर कार्यवाहीची माहिती असलेल्या एका सूत्राने सांगितले.
"बॉलिवूडमधील कलाकारांनी आता हे लक्षात घेण्याची वेळ आली आहे की हॉलिवूडप्रमाणे, येथील निर्माते देखील आता एखाद्या अभिनेत्याच्या मर्जीनुसार चित्रपटात ये-जा करणार नाहीत," असंही सूत्राने पुढे म्हटलं.
'हेरा फेरी 3' हा 2000 मधील हिट चित्रपट 'हेरा फेरी'चा सिक्वेल आहे. दुसरा भाग 2006 मध्ये प्रदर्शित झाला होता.