'...अन् मी स्मिता पाटीलच्या कानाखाली लावली'; अमोल पालेकर यांनी केला खुलासा, नेमकं काय घडलं होतं?

ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar) यांनी भूमिका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांच्या कानाखाली लगावली होती. नेमकं काय घडलं होतं हे त्यांनी सविस्तर मुलाखतीत सांगितलं आहे.  

शिवराज यादव | Updated: Dec 9, 2024, 09:42 PM IST
'...अन् मी स्मिता पाटीलच्या कानाखाली लावली'; अमोल पालेकर यांनी केला खुलासा, नेमकं काय घडलं होतं? title=

ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar) आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांनी भूमिका चित्रपटात एकत्र काम केलं होतं. चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान अमोल पालेकर यांनी स्मिता पाटील यांच्या कानाखाली लगावली होती. अनपेक्षितपणे कानाखाली बसल्यानंतर स्मिता पाटील आश्चर्यचकित झाल्या होत्या. दरम्यान यानंतर अमोल पालेकर आणि स्मिता पाटील एकमेकांच्या गळ्यात पडून रडले होते. नेमकं काय झालं होतं हे अमोल पालेकर यांनी सविस्तरपणे लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. 
 
"भूमिका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान श्याम बेनेगल यांनी मला स्मिता पाटीलला कानाखाली मारण्यास सांगितलं होतं. ते म्हणाले आपण तिला सांगायचं नाही. त्यावर मी त्यांना मी असं करणार नाही सांगितलं. तालीम केली नसलेली कोणतीही गोष्ट करण्यास मी नकार देतो. तुमच्या सह अभिनेत्याला तुम्ही काय करणार आहात हे माहिती असावं. त्याच्यापासून लपून, त्याच्या वर येण्यासाठी अशी कोणतीही गोष्ट करणं माझ्या मते चुकीची आहे. त्यात महिलेवर हात उचलणं हे मी आयुष्यात कधी केलं नाही आणि करणार नाही," असं अमोल पालेकर यांनी सांगितलं. 

पुढे ते म्हणाले, "श्याम बेनेगल नाराज झाले होते. त्यांनी मला ही ऑर्डर आहे असं सांगितलं. त्यांनी शुटिंगला सुरुवात केली. मला काय करावं हे कळत नव्हतं. शॉट सुरु झाल्यानंतर स्मिताने अभिनय सुरु केला आणि एका ठिकाणी मी तिचा हात पकडला आणि दुसऱ्या हाताने कानाखाली लावली. स्मिताचे पूर्ण हावभाव यानंतर बदलत गेले. तिच्या चेहऱ्यावर सगळा अविश्वास दिसत होता, की हे या माणसाने काय केलं. अविश्वासानंतर अपमान आणि त्यानंतर येणारा राग तिच्या चेहऱ्यावर दिसत होता". 

"यादरम्यान कॅमेरा सुरु होता. तिचे ते सर्व हावभाव कॅमेऱ्यात कैद होत होते. फक्त कॅमेराच नाही तर मीदेखील सर्व विसरुन तिला पाहत होतो. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून थक्क झालो होतो. यानंतर श्याम बेनेगल यांनी कट म्हटल्यानंतर मी स्मिताला मिठी मारली आणि माफी मागितली. आम्ही दोघं फार रडलो," असंही अमोल पालेकर यांनी सांगितलं. 

राजेश खन्ना यांच्यासह झालेल्या वादासंबंधी विचारलं असता अमोल पालेकर यांनी सांगितलं, "कोणत्याही अभिनेता, सुपरस्टारला समोरील अभिनेत्याची उंची कमी करुन आपण किती मोठं दाखवण्याची गरज काय? तुम्ही सुपरस्टारच आहात. तुम्ही समोरच्या अभिनेत्याला खाऊन टाकलं असं म्हटलं जातं. मी त्यांना नरकभक्षक अभिनेता म्हणतो. मी त्यातील नाही". 

"मी त्यांच्यासमोर काहीच बोलत नव्हतो. माझे डायलॉगही नव्हते. मग हा अभिनेता माझ्यापेक्षा किती छोटा आहे हे दाखवण्याची गरज काय? मला छोटं दाखवून तुमची उंची तर वाढत नाही. ती आपल्या बळावर आहे. हा प्रश्न माझ्या मनात येत राहिला. मी असं कधी होऊ देणार नहाी असं ठरवलं. मी अशी वागणूक कोणालाही देणार नाही. अभिनेत्याला आपला शेवटचा टप्पा सुरु झाला आहे हे समजत आहे. वेळ आपल्या हातातून निघत चालली आहे हे समजतं. त्या असुरक्षित भावनेमुळे हे होत असावं", असं अमोल पालेकर यांनी सांगितलं.