Shah Rukh Khan A Middle Class: हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक प्रयोगशील दिग्दर्शक कायमच चर्चेचा विषय ठरतात. त्यांनी केलेली विषयाची मांडणी, कथानकाची हाताळणी कायमच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते. असाच एक दिग्दर्शक म्हणजेच अनुभव सिन्हा! 'मुलक', 'आर्टीकल 15' आणि 'थप्पड'सारख्या चित्रपटांमधून अनुभवने असे समाजिक विषय मोठ्या पडद्यावर आणले ज्याचा इतर कोणी विचारही केला नसता. मात्र असं असलं तरी 2011 साली प्रदर्शित झालेल्या 'रा-वन'चं अपयश आजही अनुभवला बोचतं. बॉलिवूडचा किंग खान शाहरुखसोबत काम करण्याची संधी अनुभवला या चित्रपटाच्या निमित्ताने मिळाली. मात्र चित्रपटाचं अपयश आजही त्याला खलताना दिसतं.
"आम्ही तशी अपेक्षा होती तसं घडलं नाही. ते सारं आमच्यासाठी फार निराशाजनक होतं. मला तेव्हा फार वाईट वाटलेलं. अगदी 2018 पर्यंत म्हणजे 'मुलक' प्रदर्शित होईपर्यंत अशीच स्थिती होती. मी दिग्दर्शक म्हणून सारं काही गमावून बसणार की काय अशी स्थिती होती. मी यापुढे कधीच दिग्दर्शन करणार नाही इथपर्यंतचा विचार केलेला. मी पुढील तीन दिवसांमध्ये 'मुलक'लिहून काढला. मी त्यानंतर कथा घेऊन बाजारात गेलो तिथे पैसे मिळवण्यासाठी थोडा वेळ गेला. मात्र मी हा चित्पपट केला. मात्र माझ्यासाठी हा प्रवास कठीण होता," असं अनुभवने फेई डिसोझाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. 'रा-वन'च्या अपयशाने खचल्यासंदर्भात बोलताना शाहरुखसोबत काम करताना आयुष्यभर लक्षात राहील अशा गोष्टी शिकता आल्या असंही अनुभवने सांगितलं.
2025 सालातील आकडेवारीबद्दल बोलायचं झालं तर शाहरुख 7500 कोटींचा मालक आहे. मात्र असं असतानाही अनुभव त्याला 'मध्यमवर्गीय' म्हटलं आहे. अनुभव शाहरुखबद्दल अनुभव भरभरुन बोलला. "बनारसवरुन आलेला एक मुलगा शाहरुखच्या घरात बसला होता. त्यावेळी शाहरुख त्याला तू काय खाणार विचरत होता. त्यानंतर हा सारा प्रकार सहा वर्ष सुरु राहिला. फार मजा आली. तो फार चांगला माणूस आहे. तो मनाने आजही मध्यमवर्गीय आहे हे फारच विचित्र वाटतं. तो फारच मध्यमवर्गीय आहे आणि हा गंमत करण्याचा भाग नाही. मध्यमवर्गीय असणं हे केवळ पैशाशी संबंधित नाही असं मला वाटतं. मी त्याला शेवटचा भेटलो होतो तेव्हा म्हणालो होतो की तो फार मध्यमवर्गीय आहे. त्याने होकार दर्शवला होता. त्याच्याकडे जगातील सर्व पैसा आहे. मात्र त्यानंतरही तुम्हाला कशातून आनंद मिळतो? तुम्हीला गुचीचे प्रोडक्ट वापरुन आनंद मिळतो की तुमची बहीण आनंदी आहे हे पाहून आनंद मिळतो?" असा सवाल अनुभवने मुलाखतीदरम्यान केला.
"जगभर प्रसिद्धी मिळवल्यानंतरही इतकं साधं राहणं कठीण असतं. पैशांबद्दल बोलणं टाळलं तरी तो ज्यापद्धतीने आजही मूळाशी आणि तत्वांशी जोडलेला आहे ते भारावून टाकणारं आहे. तो फार उत्तम व्यक्ती आहे. या चित्रपटापेक्षा तुला भेटता आलं तुझ्यासोबत काम करता आलं हे मला फार महत्त्वाचं वाटतं असं मी त्याला सांगत असतो," असंही अनुभवने सांगितलं.
'रा-वन' हा चित्रपट शाहरुखच्या प्रोडक्शन कंपनीनेच निर्माण केला होता. या चित्रपटात शाहरुखबरोबरच करिना कपूर आणि अर्जून रामपालही होते. मात्र चित्रपटाला तिकीटबारीवर म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही.