प्रियंका चोप्राच्या चित्रपटाची ऑस्करमध्ये एन्ट्री; 'या' चित्रपटाला मिळालं नामांकन

चित्रपट निर्माते गुनीत मोंगा आणि प्रियंका चोप्रा निर्मित 'अनुजा' चित्रपटाला ऑस्कर 2025 साठी सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्मच्या श्रेणीसाठी नामांकन मिळाले आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 23, 2025, 08:25 PM IST
प्रियंका चोप्राच्या चित्रपटाची ऑस्करमध्ये एन्ट्री; 'या' चित्रपटाला मिळालं नामांकन

Anuja : भारतीय चित्रपट निर्माते गुनीत मोंगा आणि प्रियंका चोप्रा निर्मित 'अनुजा' या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे. 'अनुजा'ने लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्मच्या श्रेणीमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वी लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या आगीमुळे हे नामांकन पुढे ढकलण्यात आले होते, परंतु आता ते गुरुवारी 23 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी हे 17 जानेवारीला जाहीर होणार होते.

Add Zee News as a Preferred Source

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ऑस्कर पुरस्कार 2025 साठी जगभरातील चित्रपटांची यादी जाहीर करण्यात आलीये. यामध्ये 'अनुजा'ने लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म कॅटेगरीत आपले स्थान निर्माण केले आहे. हा चित्रपटात 9 वर्षांच्या 'अनुजा'ची कथा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ॲडम जे. ग्रेव्हज यांनी केले आहे. हा एक भारतीय-अमेरिकन चित्रपट आहे.

काय आहे चित्रपटाची कथा? 

या चित्रपटाची कथा एका 9 वर्षांच्या मुलीभोवती फिरते जिला तिची मोठी बहीण पलकप्रमाणेच कारखान्यात काम करणे आणि अभ्यास करणे यापैकी एक निवडणे भाग पडते. तिला बोर्डिंग स्कूलमध्ये शिकण्याची सुवर्णसंधी मिळते. 'अनुजा'साठी हा एक निर्णय आहे जो तिचे आणि तिच्या बहिणीचे आयुष्य बदलून टाकेल. या चित्रपटातील 'अनुजा'ची भूमिका 9 वर्षांची मुलगी सजदा पठाण हिने साकारली आहे. सजदाने यापूर्वी 2023 मध्ये आलेल्या 'द ब्रेड' या चित्रपटात देखील काम केले आहे.

अनन्या शानभागने 'अनुजा' चित्रपटात सजदा पठाणच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारली आहे. यासोबतच या शॉर्ट फिल्ममध्ये नागेश भोसले आणि गुलशन वालिया देखील आहेत. स्कार्स पुरस्कार सोहळा हा 2 मार्च 2025 रोजी पार पडणार आहे. या सोहळ्याचे सूत्रसंचालन कॉनन ओब्रायन करणार आहेत. तर 'अनुजा' ने आतापर्यंत न्यूयॉर्क शॉर्ट्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2024, हॉलिवूड शॉर्ट्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट लाइव्ह इन ॲक्शन फिल्म आणि मॉन्ट क्लेअर फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार जिंकले आहेत. 

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More