`धकधक गर्ल`ची राजकारणात एन्ट्री?
`या` पक्षाकडून लढवणार निवडणूक?
मुंबई : चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित लवकरच राजकारणात प्रवेश करण्याती चिन्हं आहेत. गेल्या काही दिवसांपासून २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकांसाठी ती पुण्यातून निवडणूक लढवणार असल्याचं कळत आहे.
भारतीय जनता पार्टीच्या पुण्यातील काही नेतेमंडळींनी तिच्याकडे निवडणूक लढवण्याविषयीची विचारणा केल्याचं कळत आहे. सोशल मीडियावर तिच्या या नव्या इनिंगविषयी बऱ्याच चर्चा सुरु असून, अनेकांनीच आता यावर आपल्या प्रतिक्रिया देण्यासही सुरुवात केली आहे.
काही महिन्यांपूर्वीच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी माधुरीच्या घरी जात तिची भेट घेतली होती. तेव्हापासूनच बॉलिवूडची ही 'धकधक गर्ल' राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी डोकं वर काढलं होतं.
'डीएनए'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार पुण्यातील लोकसभेच्या जागेवर लढण्यासाठी माधुरीच्या नावाला पसंती मिळत असल्याचं भाजपा नेत्यांनी केलेल्या एका सर्व्हेतून लक्षात आलं आहे. पण, स्थानिक भाजपा नेत्यांनी मात्र या साऱ्याविषयी आपण अनभिज्ञ असल्याचं म्हटलं आहे.
'निवडणूकीसाठी उमेदवाराची निवड करण्याची एक ठराविक प्रक्रिया आहे. त्यातही लोकसभा निवडणूकांविषयी सांगावं तर, केंद्रीय संसदीय समितीकडेच उमेदवाराची निवड करण्याचे अधिकार आहेत', असं भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गावडे म्हणाले. त्यामुळे आता नेमकं माधुरी दीक्षित राजकारणाच्या पडद्यावर झळकणार का, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.