)
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या 60 कोटींच्या घोटाळ्यामुळे चर्चेत असली तरी तिच्या ‘बॅस्टियन’ या रेस्टॉरंट ब्रँडची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. मुंबई, पुणे, बेंगलोर आणि आता गोवा या चार शहरांत विस्तारलेल्या या लक्झरी रेस्टॉरंट चेननं हाय-क्लास डाइनिंग संस्कृतीला नवा चेहराच दिला आहे. सुरुवातीला वरळी येथे सुरू झालेलं ‘बॅस्टियन’ रेस्टॉरंट काही काळानंतर दादरमध्ये हलवण्यात आलं. ‘बॅस्टियन ॲट द टॉप’ नावाने ओळखलं जाणारं हे रेस्टॉरंट आता मुंबईतील सर्वात लोकप्रिय आणि महागड्या ठिकाणांपैकी एक मानलं जातं. या रेस्टॉरंटमध्ये रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते, असं म्हटलं जातं.
पण, आता या रेस्टॉरंटसंदर्भात आणखी एक मोठी आणि रोचक माहिती समोर आली आहे भाजपचे नेते प्रसाद लाड हे ‘बॅस्टियन’ रेस्टॉरंटमध्ये 33.33 टक्के भागीदार आहेत.
अलीकडेच ‘बी यू विथ श्रद्धा एस’ या यूट्यूब चॅनेलवरील मुलाखतीत प्रसाद लाड यांनी स्वतः ही माहिती दिली. ते म्हणाले 'आम्ही रेस्टॉरंटच्या मोठ्या बिझनेसचा भाग आहोत. हा माझ्या मुलाचा पॅशन प्रोजेक्ट आहे. ‘बॅस्टियन’मध्ये शिल्पा शेट्टी आणि रणजीत बिंद्रा हे प्रमुख भागीदार आहेत. त्यांच्यासोबत आम्ही देखील 33.33 टक्क्यांचे पार्टनर आहोत. ‘बॅस्टियन’ ब्रँडचा भाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे.' लाड यांनी याच मुलाखतीत त्यांच्या इतर उद्योग क्षेत्रातील प्रकल्पांबद्दल आणि व्यावसायिक विस्ताराच्या योजना देखील सांगितल्या.
दादरमधील कोहिनूर स्क्वेअरच्या 48व्या मजल्यावर वसलेलं ‘बॅस्टियन ॲट द टॉप’ हे मुंबईतील सर्वात आकर्षक रेस्टॉरंट्सपैकी एक ठरलं आहे. 2023 मध्ये सुरू झालेलं हे रेस्टॉरंट त्याच्या रूफटॉप पूल, आलिशान इंटीरियर आणि लक्झरी डाइनिंग अनुभवासाठी प्रसिद्ध आहे. या रेस्टॉरंटमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीज, उद्योगपती, तसेच समाजातील नामवंत व्यक्ती नियमितपणे भेट देतात. आठवड्याच्या शेवटी येथे टेबल बुकिंग मिळवणंही कठीण ठरतं, इतका प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी दिसून येतो. ‘बॅस्टियन’ची खासियत म्हणजे आधुनिक मेन्यू आणि सुसंस्कृत वातावरण. सीफूडपासून आंतरराष्ट्रीय डिशेसपर्यंत अनेक अनोखे फ्यूजन फ्लेवर्स येथे उपलब्ध आहेत. या ब्रँडने ‘लक्झरी डाइनिंग’चा नवा दर्जा निर्माण केला आहे.
शिल्पा शेट्टी सध्या ‘बॅस्टियन’ ब्रँडचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. वांद्र्यातील ‘बॅस्टियन’ शाखा बंद करण्यात आली असून, त्या जागी ‘अम्मकाई’ नावाचं दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांवर आधारित नवं रेस्टॉरंट सुरू होणार आहे. याशिवाय, शिल्पा शेट्टी लवकरच ‘बॅस्टियन बीच क्लब’ या नव्या प्रोजेक्टद्वारे जुहूमध्ये समुद्रकिनाऱ्यावर लक्झरी रेस्टॉरंट सुरू करण्याच्या तयारीत आहे. हे ठिकाण प्रामुख्याने बीच-डाइनिंग अनुभव आणि प्रायव्हेट इव्हेंट्ससाठी डिझाइन करण्यात येत आहे.
अभिनयासोबतच शिल्पा शेट्टी आता एक यशस्वी उद्योजिका म्हणूनही ओळख निर्माण करत आहे. फिटनेस, फूड आणि फॅशन या तीन क्षेत्रांत तिची सक्रिय गुंतवणूक आहे. ‘बॅस्टियन’ मालिकेनं तिला रेस्टॉरंट इंडस्ट्रीत एक भक्कम स्थान मिळवून दिलं आहे.
FAQ
‘बॅस्टियन’ रेस्टॉरंटमध्ये भाजप नेत्याची किती भागीदारी आहे?
भाजप नेते प्रसाद लाड यांनी खुलासा केला आहे की, त्यांची 33.33 टक्क्यांची भागीदारी या रेस्टॉरंटमध्ये आहे.
‘बॅस्टियन ॲट द टॉप’ कुठे आहे आणि त्याची खासियत काय आहे?
हे रेस्टॉरंट दादरच्या कोहिनूर स्क्वेअरच्या 48व्या मजल्यावर आहे. आलिशान सजावट, रूफटॉप पूल आणि लक्झरी वातावरण यासाठी ते प्रसिद्ध आहे.
शिल्पा शेट्टीचा पुढील रेस्टॉरंट प्रोजेक्ट कोणता आहे?
शिल्पा लवकरच जुहूमध्ये ‘बॅस्टियन बीच क्लब’ सुरू करणार आहे, तर वांद्र्यातील ‘अम्मकाई’ हे दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांवर आधारित रेस्टॉरंट उघडण्याची तयारी सुरू आहे.