मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन  यांचं आणि माध्यमांचं एक खास नातं आहे. अतिशय खेळीमेळीच्या आणि मैत्रीपूर्ण असं हे नातं. पण, बिग बींच्याच पत्नीचं म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांचं माध्यमांशीच नव्हे, तर चाहत्यांशी असणारं नातं हे तसं बेताचंच. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला. अतिशय शिस्तप्रिय स्वभावाच्या जया बच्चन या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानाच्या निमित्ताने मतदान केंद्रावर पोहोचल्या होत्या. इथे त्यांचा संताप अनावर झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत जुहू येथील मतदान केंद्रावर जया बच्चन त्यांचा मुलगा, अभिषेक बच्चन आणि सून, अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासह पोहोचल्या होत्या. मत दिल्यानंतर जया बच्चन परतत असतानाच तिथे रुजू असणाऱ्या पोलिंग ऑफिसर अर्थात निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत एक फोटो काढण्याची विनंती केली. त्यांच्या याच विनंतीवर बिग बींच्या पत्नीचा म्हणजेच जया बच्चन यांचा संताप अनावर झाला. 


निवडणूक अधिकाऱ्यांना त्यांची ही कृती अतिशय चुकीची असल्याचं त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितल्य़ाची माहिती सुत्रांनी दिली. मी इथे मतदानासाठी आले आहे. तुम्ही इथे अधिकारी आहात. फोटोसाठी विनंती करण्याजोगी क्षुल्लक मागणी/ विनंती तुम्ही करुच शकत नाहीत, या शब्दांत जया बच्चन यांनी तिथे असणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांना सुनावलं. त्यांचा संताप पाहून अधिकाऱ्यांनाही धक्काच बसला. 



मतदान केंद्रातील या प्रकारानंतर जया बच्चन तेथून बाहेर आल्या, तेव्हा बाहेर असणाऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधींवरही त्या भडकल्या; अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. कॅमेऱ्याला धक्का देत त्या थेट कारमध्ये जाऊन बसल्या. त्या प्रसंगी ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या चेहऱ्यावरील भावही बदलले होते.