Actress on Childhood: एका क्रिकेटरची बहीण बॉलिवूडची अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक खुलासा केला आहे. तिने तिच्या लहानपणाबद्दल मोकळेपणाने सांगितलं आहे.

Malti Chahar shares about her childhood trauma: एका रियालिटी शोमुळे घराघरामध्ये पोहचलेली अभिनेत्री म्हणजे मालती चाहर. मालती अनेकदा चर्चेत असते. भारतीय क्रिकेटपटू दीपक चाहर यांची बहीण असलेल्या मालती तिच्या अनेक मुलाखतीमुळे चर्चेत असते. तिने तो रियालिटी शो संपल्यावर दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या बालपणातील कठीण अनुभव आणि घरातील वातावरणाबद्दल खुलेपणाने भाष्य केले. मालती अनेकदा तिचा भाऊ दीपक चहरला चिअर करताना आयपीएल सामन्याला दिसते. मालतीच्या म्हणण्यानुसार, तिचं बालपण खूप तणावपूर्ण वातावरणात गेलं. आई-वडिलांमध्ये सतत भांडणं होत असत आणि मोठी मुलगी असल्याने तिला हे सगळं जवळून पाहावं लागत होतं. घरातील वातावरण इतकं ताणतणावाचं होतं की त्याचा तिच्या मानसिकतेवर खोल परिणाम झाला. तिचा भाऊ क्रिकेटमध्ये व्यस्त असल्याने तो या परिस्थितीपासून काही प्रमाणात दूर राहायचा, पण मालतीला मात्र हे सगळं सहन करावं लागत होतं.
तिने पुढे सांगितले की, तिला लहानपणापासूनच स्वतःच्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याची मोकळीक नव्हती. तिला मॉडेलिंग आणि ग्लॅमर क्षेत्रात करिअर करायचं होतं, तसेच मिस इंडिया स्पर्धेत भाग घ्यायची तिची इच्छा होती. पण तिच्या वडिलांची अपेक्षा वेगळी होती. त्यांना ती IPS अधिकारी व्हावी असं वाटत होतं. त्यामुळे तिला तिच्या स्वप्नांपासून दूर ठेवण्यासाठी अनेक बंधने घातली गेली. अकरावीपर्यंत तिला लहान केस ठेवावे लागत होते आणि स्वतःच्या आवडीनिवडी व्यक्त करण्याचीही संधी नव्हती.
मालतीने तिच्या बालपणातील आणखी एक वेदनादायक बाजूही उघड केली. ती म्हणाली की, घरातील वादांच्या पार्श्वभूमीवर कधी कधी आई-वडील तिच्यावर राग काढायचे. “आम्ही एका छोट्याशा 1BHK घरात राहत होतो. आई-वडिलांमध्ये भांडणं सुरू झाली की मला कुठेही जाण्याची जागा नसायची. कधी आई रागाच्या भरात मला मारायची, तर कधी वडीलही तसं करायचे,” असे तिने सांगितले. तिच्या मते, त्या वेळी पालकांना याचा तिच्यावर काय परिणाम होतोय, याची जाणीव नव्हती.
तिच्या आई-वडिलांमधील मतभेद इतके वाढले की अखेर त्यांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. गेल्या सुमारे 13 वर्षांपासून ते एकत्र राहत नाहीत. या सगळ्या अनुभवांनी मालतीच्या व्यक्तिमत्त्वावर खोल ठसा उमटवला आहे.
आज मालती चाहर आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे.आता ती आपल्या भूतकाळाबद्दल मोकळेपणाने बोलत आहे, जे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.