आलियाच्या आईवर बलात्काराचा प्रयत्न
या सर्व गोष्टी लपवून ठेवल्या कारण...
मुंबई: महिलांवर होणारे अत्याचार, लैंगिक शोषण, त्यांची होणारी घुसमट या साऱ्याला वाचा फोडण्यासाठी #MeToo ही मोहिम सुरु करण्यात आली. पाहता पाहता परदेशात सुरु झालेली ही मोहिम हिंदी कलाविश्वात अशी काही स्थिरावली की अनेक गोष्टींविषयी या मोहिमेअंतर्गत गौप्यस्फोट झाल्याचं पाहायला मिळालं.
आता अभिनेत्री आलिया भट्टची आई सोनी राझदान यांनीही आपल्यासोबत घडलेल्या एका प्रसंगाविषयीची माहिती 'क्विंट'ला दिली आहे.
एका मुलाखतीदरम्यान त्यांनी अभिनेते आलोकनाथ यांच्या वर्तणूकीवरही भाष्य केल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळालं.
विनता नंदा या आपल्या खूप चांगल्या संपर्कात असल्याचं सांगत त्यांनी आलोकनाथ यांच्याविषयी लिहिलेली पोस्ट पाहून मला धक्काच बसल्याची प्रतिक्रिया राझदान यांनी दिली.
'मद्यधुंद अवस्थेत असतानाचे आलोकनाथ अतिशय वाईट असतात. ते मद्याच्या नशेत नसतात त्यावेळी ते अतिशय चांगल्या पद्धतीने वागतात पण, नशेत असताना मात्र त्यांची वागणूक मला आवडत नाही', असं त्या म्हणाल्या.
तुम्ही अशा कोणत्या प्रसंगाचा सामना केला आहे का, असा प्रश्न विचारला असता राझदान यांनी एक असा प्रसंग जागवला ज्याच्या आठवणी त्या आजही विसरु शकलेल्या नाहीत.
'कामाच्या निमित्ताने कधीच अशा प्रसंगाचा सामना केला नव्हता. पण, एका चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न मात्र झाला होता. पण, सुदैवाने तसं काहीच झालं नाही', असं त्यांनी सांगितलं.
'मी त्यावेळी एकाच कारणासाठी या सर्व गोष्टी लपवून ठेवल्या कारण, दुष्कृत्य करणाऱ्या त्या व्यक्तीला बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं असतं. त्यांचं एक हसतंखेळतं कुटुंब होतं. लहान मुलं होती. मला त्यांना त्रास द्यायचा नव्हता त्यामुळे या घटनेविषयी मी कसंबसं मौन पाळलं होतं', असं म्हणत त्या व्यक्तीचा खरा चेहरा समोर आणतेवेळी सोनी राजदान यांच्या शब्दांची धार आणि त्यांचा संताप सर्वकाही सांगून जात होता.
आजच्या घडीला जर असं काही घडलं असतं तर मात्र मी त्या व्यक्तविरोधात कोणतीच फिकीर न बाळगता थेट पोलिसांत त्याची तक्रार केली असती, असं सांगत त्यांनी आपली ठाम भूमिका मांडली.
काही वर्षांपूर्वी अशा प्रकरणांविषयी तक्रार करणं तितकं सोपं नव्हतं असं सांगत त्यांनी एक वेगळीच परिस्थिती सर्वांसमोर ठेवली.
राजदान यांच्यासोबत घडलेल्या या प्रसंगाला वाचा फुटल्यामुळे सध्या त्याविषयीच्या बऱ्याच चर्चाही पाहायला मिळत आहेत.