मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणी वाढल्या, मुंबई पालिकेने पाठवली नोटीस, कारणही आले समोर!

Mithun Chakraborty: मला मालाडमधील एरंगल येथे सुरू असलेल्या बीएमसी मोहिमेचा एक भाग म्हणून नोटीस मिळाल्याचे मिथून म्हणाले. 

प्रविण दाभोळकर | Updated: May 18, 2025, 05:20 PM IST
मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणी वाढल्या, मुंबई पालिकेने पाठवली नोटीस, कारणही आले समोर!
मिथून चक्रवर्ती

Mithun Chakraborty: बॉलिवूड स्टार मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच बीएमसीने मिथुन चक्रवर्ती यांना नोटीस पाठवलीय. मिथून यांनी मालाड परिसरातील ग्राउंड आणि मेझानाइन मजल्यांचे अनधिकृत बांधकाम केल्याचे सांगण्यात येतंय. यासंदर्भात त्यांना 'कारणे दाखवा' नोटीस पाठवण्यात आली आहे. मेझानाइन फ्लोअर हा एक आंशिक फ्लोअर असतो, जो सहसा दोन मजल्यांमध्ये असतो.

मिथून यांनी काय दिलं उत्तर?

मला मालाडमधील एरंगल येथे सुरू असलेल्या बीएमसी मोहिमेचा एक भाग म्हणून नोटीस मिळाल्याचे मिथून म्हणाले. ते म्हणाले, 'माझ्याकडे कोणतेही बेकायदेशीर किंवा अनधिकृत बांधकाम नाही. तरी नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत, आम्ही त्यांना उत्तर देत आहोत'.

10 मे रोजी जारी केलेल्या कारणे दाखवा नोटीसनुसार, मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामासाठी मुंबई महानगरपालिका कायद्याच्या कलम 475अ अंतर्गत खटला चालवण्याचा इशारा देण्यात आलाय. कलम 475अ मध्ये कोणतेही अनधिकृत बांधकाम न काढल्यास दंड आकारला जातो.

या सूचनेत दोन तळमजल्यावरील मेझानाइन लेव्हल युनिट्स आणि तीन तात्पुरत्या 10 बाय 10 युनिट्सचा उल्लेख आहे. जे विटांच्या दगडी भिंती, लाकडी फळ्या, काचेचे विभाजन आणि एसी शीट सीलिंगच्या मिश्रणाचा वापर करून बांधले गेले आहे. ही बांधकामे परवानगीशिवाय करण्यात आल्याचे नोटीसमध्ये म्हटलंय.

'ही इमारत किंवा काम का काढून टाकू नये?, बदलू नये किंवा पाडू नये? किंवा जागेचा वापर का पुनर्संचयित करू नये?' असा प्रश्न पालिकेने मिथून यांना विचारलाय. याचे उत्तर देण्यासाठी एका आठवड्याची वेळ देण्यात आली होती. मिथुन चक्रवर्ती हे एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आहेत. त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. एक काळ असा होता जेव्हा त्यांचा अभिनय आणि शैली लोकांमध्ये खूप लोकप्रिय होती. ते अभिनय आणि नृत्यातील त्यांच्या वेगळ्या शैलीसाठी ओळखले जातात.

मिथून यांच्याकडे किती संपत्ती?

समोर आलेल्या रिपोर्टनुसार, मिथून यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. तामिळनाडूतलं उटी, मसिनागुडी आणि कर्नाटकमधलं मैसूर या ठिकाणी मिथूनच्या मालकिची लग्झरी हॉटेल्स आहेत. मिथूनच्या फक्त उटीमधल्या हॉटेलमध्येच 59 खोल्या, 4 लग्झरी सुट्स, हेल्थ फिटनेस सेंटर, इनडोर स्विमिंग पूल, लेसर डिस्क थिएटर, मिड नाईट काऊ बॉय बार ऍन्ड डिस्को याबरोबरच किड्स कॉर्नर आहे. मसिनागुडीमधल्या हॉटेलमध्ये 16 एसी बंगले, 14 ट्विन्स मचांस, 4 स्टॅन्डर्ड रूम, मल्टीकुशन रेस्टॉरंट आणि चिल्ड्रन प्ले ग्राऊंड आहे. याबरोबरच जीपमधून जंगल राईड, हॉर्स रायडिंग यासारख्या सुविधाही या हॉटेलमध्ये उपलब्ध आहेत. मिथूनच्या मैसूरमधल्या हॉटेलमध्ये 18 एसी कॉटेज, 2 एसी सुट्स, ओपन एअर मल्टीकुशन रेस्टॉरंट याबरोबरच स्विमिंग पूल, पूल टेबल आणि ट्रॅव्हल रिलेडेट सुविधाही उपलब्ध आहेत.