ऐकतानाच हृदयाला भिडणारं 90 च्या दशकातील 4 मिनिटं 9 सेकंदांचं सुपर रोमँटिक गाणं, कितीही ऐकलं तर मन भरत नाही

90 च्या दशकातील 4 मिनिटे 9 सेकंदाचे रोमँटिक गाणे ज्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. वारंवार ऐकल्यानंतरही लोक त्याच्या प्रेमात होते.   

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 18, 2025, 05:51 PM IST
ऐकतानाच हृदयाला भिडणारं 90 च्या दशकातील 4 मिनिटं 9 सेकंदांचं सुपर रोमँटिक गाणं, कितीही ऐकलं तर मन भरत नाही

Bollywood Superhit Song: 90 चे दशक म्हणजे हिंदी सिनेमातील संगीताचा सुवर्णकाळ. त्या काळातील गाणी फक्त ऐकण्यापुरती नव्हती तर ती मनात रुजत होती. संगीतकार, गायक आणि गीतकार यांच्यातील सुरेल समन्वय प्रत्येक गाण्याला एक वेगळीच जादू देत होता. 

Add Zee News as a Preferred Source

त्या काळात रोमान्स म्हणजे केवळ प्रेमकहाणी नव्हे तर भावना, कोमलता आणि एकमेकांबद्दलचं नातं व्यक्त करणं होतं. अशाच एका अमर गाण्याची आज पुन्हा आठवण काढूया.  ‘पहली पहली बार है’. हे गाणं आजही लोकांच्या मनात ताजं आहे आणि पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतं.

सलमान–माधुरीची अप्रतिम केमिस्ट्री

1994 साली प्रदर्शित झालेला ब्लॉकबस्टर चित्रपट ‘हम आपके हैं कौन’ मध्ये सलमान खान आणि माधुरी दीक्षित या जोडीने अफाट लोकप्रियता मिळवली. या चित्रपटातील 'पहली पहली बार है' या गाण्यात त्यांची केमिस्ट्री जणू जिवंत वाटते. प्रेम आणि निशाच्या नात्यातील पहिल्या प्रेमाची निरागसता, लाज आणि गोडवा हे गाणं अतिशय सुंदरपणे दाखवतं.

सुपरहिट चित्रपटाची कहाणी

या सुरेल गाण्याचे संगीतकार होते राम-लक्ष्मण तर आवाज दिला होता लता मंगेशकर आणि एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी ही जोडीच स्वतःमध्ये जादू आहे. गाण्याचे हृदयस्पर्शी बोल लिहिले होते रवींद्र जैन यांनी. या गाण्याची लोकेशन, कोरियोग्राफी आणि रंगसंगती प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून गेली.

सूरज बडजात्या दिग्दर्शित आणि राजश्री प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली तयार झालेला हा चित्रपट भारतीय सिनेमासाठी एक मैलाचा दगड ठरला. सलमान आणि माधुरी व्यतिरिक्त रेणुका शहाणे, मोहनीश बहल, रीमा लागू, अनुपम खेर आणि आलोक नाथ या कलाकारांनी आपल्या अभिनयाने चित्रपटाला वेगळंच रूप दिलं. या चित्रपटात एकूण 14 गाणी होती आणि जवळजवळ प्रत्येक गाणं सुपरहिट ठरलं.

बॉक्स ऑफिसवर गाजलेला ब्लॉकबस्टर

या चित्रपटाचे बजेट 6 कोटी रुपये होते पण या चित्रपटाने जगभरात 128 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. त्या काळात ही रक्कम प्रचंड मोठी होती आणि या चित्रपटाने ‘शोले’सारख्या चित्रपटाचा विक्रम मोडला.

आजही 'पहली पहली बार है' हे गाणं लोकांच्या प्लेलिस्टमध्ये आहे. या गाण्यातलं निरागस प्रेम, गोड संगीत आणि सलमान–माधुरीची जादू हे सगळं मिळून ते गाणं आजही अमर ठरलं आहे.

FAQ

‘पहली पहली बार है’ हे गाणे कोणत्या चित्रपटातील आहे आणि ते कधी प्रदर्शित झाले?

हे गाणे १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘हम आपके हैं कौन..!’ चे आहे. सूरज बडजात्या दिग्दर्शित या चित्रपटाने ९० च्या दशकातील रोमान्स आणि संगीताची जादू प्रेक्षकांना भेट दिली. गाण्यात सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांची निरागस केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनात कायम राहिली.

गाण्याचे संगीतकार, गायक आणि गीतकार कोण होते?

संगीतकार राम-लक्ष्मण हे आहेत, ज्यांनी गाण्याला सुरांचा सुंदर संगम दिला. लता मंगेशकर आणि एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी गायन केले, ज्यामुळे गाण्याला हृदयस्पर्शी आवाज मिळाला. गीतकार रवींद्र जैन यांनी लिहिलेले बोल प्रेमाची कोमलता आणि पहिल्या भेटीचा गोडवा उत्तमरीत्या व्यक्त करतात.

‘हम आपके हैं कौन..!’ चित्रपटातील मुख्य कलाकार कोण कोणते?

सलमान खान आणि माधुरी दीक्षित ही मुख्य जोडी आहे, ज्यांची केमिस्ट्री चित्रपटाची खासियत ठरली. इतर कलाकारांमध्ये रेणुका शहाणे, मोहनीश बहल, रीमा लागू, अनुपम खेर आणि आलोक नाथ यांचा समावेश आहे. चित्रपट राजश्री प्रॉडक्शन्सचा असून, तो भारतीय सिनेमातील मैलाचा दगड आहे.

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More