बॉलिवूडचा सर्वात महाग चित्रपट; तब्बल 7 अभिनेते करणार होते काम; ट्रोलर्सने शूट सुरु होण्याआधीच संपवला

बॉलिवूडचा सर्वात महागडा चित्रपट म्हणून चर्चेत आला हा चित्रपट तयारच होऊ शकला नाही. या चित्रपटात एकूण 7 अभिनेते काम करणार होते.   

शिवराज यादव | Updated: May 16, 2025, 03:40 PM IST
बॉलिवूडचा सर्वात महाग चित्रपट; तब्बल 7 अभिनेते करणार होते काम; ट्रोलर्सने शूट सुरु होण्याआधीच संपवला

2019 वर्ष सुरु झालं होतं आणि कोविड-19 ची चाहूल अद्याप जगाला लागलेली नव्हती. दुसरीकडे बॉलिवूडमध्ये भरभराट सुरु होती आणि घराणेशाही हा फक्त एक लोकप्रिय शब्द होता. अद्यापही नेपोटिझम करिअरला खीळ घालू शकला नव्हती. पण एका चित्रपटामुळे त्याची चर्चा सुरु झाली होती. या चित्रपटाची शुटिंगही सुरु होऊ शकली नाही. पण या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीची व्याख्या बदलण्याची तयारी केली होती. सर्वात महागडा बॉलिवूड चित्रपट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चित्रपटात सात मोठे अभिनेते काम करणार होते.  करण जोहरचा तख्त हा चित्रपट बहुतेकांपेक्षा जास्त महत्त्वाकांक्षी होता. पण मग त्याचे काय झाले?

बॉलिवूडचा सर्वात महागडा चित्रपट

2019 मध्ये, करण जोहरने 'ए दिल है मुश्किल' नंतर त्याच्या पुढील चित्रपटाची घोषणा केली होती. 'तख्त' नावाचा हा चित्रपट सम्राट शाहजहाँच्या कारकिर्दीच्या शेवटी मुघल साम्राज्यात सत्ता हस्तगत करण्याच्या अवतीभोवती फिरणारा होता. चित्रपटाचा केंद्रबिंदू दोन राजकुमार  आलमगीर (नंतर औरंगजेब) आणि दारा शिकोह यांच्या सिंहासनासाठीच्या लढाईवर होता. करण जोहरने या चित्रपटाचं वर्णन 'मध्ययुगीन काळातील कभी खुशी कभी गम' असं केलं होतं. या चित्रपटात शाहजहाँच्या भूमिकेत अनिल कपूर, औरंगजेबच्या भूमिकेत विक्की कौशल, प्रिन्स दारा शिकोहच्या भूमिकेत रणवीर सिंग, राजकुमारी जहाँआरा म्हणून करीना कपूर आणि राजकुमारी रोशनआराच्या भूमिकेत भूमी पेडणेकर यांचा समावेश होता. आलिया भट्ट औरंगजेबची पत्नी दिलरास बानोच्या भूमिकेत दिसणार होती, तर जान्हवी कपूर दारा शिकोहची पत्नी नादिराची भूमिका साकारणार होती.

रिपोर्टनुसार, या चित्रपटाचं बजेट तब्बल 250 कोटी इतकं होतं. त्यावेळी तो चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात महागडा चित्रपट ठरला असता. त्यावेळी, ठग्स ऑफ हिंदुस्तान (220 कोटी ) हा सर्वात महागडा हिंदी चित्रपट होता. तेव्हापासून, ब्रह्मास्त्र आणि आदिपुरुष यांनी हा विक्रम मोडला आहे. जर तख्त त्याच्या निर्धारित बजेटवर बनवला असता तर बाहुबली पहिला भाग (180 कोटी) आणि पुष्पा द राइज (100 कोटी) पेक्षाही मोठा असता.

तख्तचं काय झालं?

मार्च 2020 मध्ये तख्त चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात होणार होती. पहिल्या पोस्टरमध्ये डिसेंबर 2021 ही रिलीज तारीख जाहीर करण्यात आली होती. पण करोनाचा उद्रेक झाला आणि शुटिंग थांबली. तरीही करण जोहर चित्रपट पुन्हा सुरु करण्याबद्दल आशावादी होता.

चित्रपटाबद्दल बोलताना करणने पत्रकारांना सांगितलं की, "तो चित्रपट माझ्या हृदयाचा एक भाग आहे. त्यावर अडीच वर्षे तयारी केली आहे. आम्ही तयारी करत होतो. मला अजूनही आठवतं की, आम्ही 24 एप्रिल रोजी सुरुवात करत होतो जेव्हा मार्चमध्ये करोना आला. चित्रपट इतका प्रचंड, मोठा आणि गुंतागुंतीचा होता की त्यासाठी दररोज एक हजार कामगारांना साइटवर जावे लागत होते. तो अशा प्रकारचा चित्रपट होता."

पण , जून 2020 मध्ये सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर चर्चेनंतर हिंदी चित्रपटांना मिळालेल्या प्रतिसादामुळे परिस्थिती बदलली. स्टार किड्सना ऑनलाइन ट्रोलिंग सहन करावं लागलं. करण जोहर 'नेपोटिझमचा चेहरा' बनला. 'नेपो किड्स'वरील टीका करण जोहरभोवती केंद्रीत झाली. 'तख्त'मध्ये 3 स्टार किड्स मुख्य भूमिकेत होते. हा करण जोहरचा ड्रीम प्रोजेक्ट होता, त्यामुळे ही टीका त्याच्याभोवती फिरत राहिली.

लॉकडाउन संपल्यानंतरही करण पुन्हा 'तख्त' चित्रपटाचं शुटिंग सुरु करु शकला नाही. करणने अखेर ट्विटर बंद केले आणि काही काळ सगळ्यापासून दूर गेला. 2021 मध्ये, त्याने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाची घोषणा केली. यानंतर तख्त मागे पडला, जो कधीही पुन्हा सुरू झाला नाही. 2025 पर्यंत चित्रपटाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नसली तरी, करण तो पुन्हा सुरू करण्यास उत्सुक नाही असं समजत आहे.