गंभीर आजाराशी झुंज देणारा इरफान खान मायदेशी परतला, कारण...

यानंतर तो पुन्हा एकदा उपचारांसाठी परदेशी रवाना होणार आहे.  

Updated: Nov 6, 2018, 01:19 PM IST
गंभीर आजाराशी झुंज देणारा इरफान खान मायदेशी परतला, कारण...

मुंबई : रुपेरी पडदा, कलाविश्व आणि चाहत्यांची गर्दी या साऱ्यापासून हिंदी कलाविश्वातील एक चेहरा गेल्या बऱ्याच काळापासून दूर आहे. अतिशय दुर्धर अशा आजाराशी तो झुंज देत असून, परदेशात त्या आजारावर उपचारही घेत आहे. तो चेहरा म्हणजे अभिनेता इरफान खान याचा.

न्यूरोएऩ्डोक्राईन ट्युमर नावाच्या कॅन्सरच्या आजाराने इरफानला ग्रासलं असून गेल्या बऱ्याच काळापासून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने मोजक्या वेळी प्रेक्षकांना आपल्या तब्येतीविषयीची माहितीही दिल्याचं पाहायला मिळालं आहे. 

आरोग्याकडे लक्ष देत त्याने चित्रपट कारकिर्दीवरही लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, तो लवकरच भारतात परतणार असून 'हिंदी मिडियम २' आणि उधम सिंह यांच्या बायोपिकच्या चित्रीकरणास सुरुवात करणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. 

डिसेंबर महिन्यातच तो मायदेशी परतणार असल्याचं म्हटलं जात असतानाच आता तो मायदेशी परतला असल्याचं कळत आहे. 

'मि़ड डे'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार  इरफान दिवाळीच्या निमित्ताने भारतात परतला असून, तो कुटुंबीयांसमवेत या सणाचा आनंद घेणार आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक येथील फार्महाऊसवर इरफान आणि त्याचं कुटुंब दिवाळीचा सण साजरा करणार आहेत. तो दहा दिवसांसाठी मायदेशी परतला असून, यानंतर तो पुन्हा एकदा उपचारांसाठी परदेशी रवाना होणार आहे.

दरम्यान, आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणाकडे तो पुन्हा एकदा वळणार की नाही यावर मात्र प्रश्नचिन्हं कायम आहे. त्यामुळे आता निमित्त काहीही असो, इरफान मायदेशी परतल्याचाच आनंद त्याच्या चाहत्यांच्या वर्तुळात आहे.