मोठी बातमी | सीबीआयकडून SSR आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीविरोधात FIR

रियासह आणखी सहा जणांवर सीबीआयकडून एफआयआर दाखल 

Updated: Aug 6, 2020, 08:52 PM IST
मोठी बातमी | सीबीआयकडून SSR आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीविरोधात FIR
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. ज्यानंतर त्याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास विविध अंगांनी करण्यात आला. सध्याच्या घडीला मिळालेल्या माहितीनुसार आता हे संपूर्ण प्रकरण CBI च्या हाती गेलं असून, सुशांतची प्रेयसी आणि त्याच्यासमवेत एकेकाळी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या अभनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. 

रियासह आणखी सहा जणांवर सीबीआयकडून एफआयआर दाखल करण्यात आली आहे. गुरुवारी सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आली. 

एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, रिया चक्रवर्ती, इंद्रजित चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, श्रुती मोदी आणि या प्रकरणाशी संबंधित इतरांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. 

आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं, गुन्हयाचा कट रचणं, चोरी, फसवेगिरी आणि धमकी देण्यासमवेत इतरही गंभीर आरोप रियावर या एफआयआरअंतर्गत करण्यात आले आहेत. सीबीआयकडून रियाच्या नावे एफआयआर दाखल करण्यापूर्वी सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी पाटण्यामध्ये तिच्याविरोधात FIR दाखल केली होती. ज्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी शिफारस केली होती.